पारडीत इसमाचा खून; चार आरोपींना अटक
By admin | Published: March 7, 2017 12:27 AM2017-03-07T00:27:03+5:302017-03-07T00:27:03+5:30
घरी झोपून असलेल्या एका इसमाला सोबत घेऊन गेले. त्यानंतर त्याचा मृतदेह खाटेवर ठेऊन आरोपी पसार झाले.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : पैशाचा वाद भोवला, उत्तरीय तपासणीच्या अहवालानंतर उलगडणार खुनाचे रहस्य
भंडारा : घरी झोपून असलेल्या एका इसमाला सोबत घेऊन गेले. त्यानंतर त्याचा मृतदेह खाटेवर ठेऊन आरोपी पसार झाले. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील पारडी येथे घडली. खुशाल पगाजी कापगते (४०) रा.पारडी असे मृतकाचे नाव आहे. या घटनेची तक्रार सोमवारी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास मृतकाच्या पत्नीने लाखांदूर पोलिसात केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची सूत्रे फिरवित १२ तासात चार जणांना अटक केली.
माहितीनुसार, पारडी येथे खुशाल कापगते व त्याची पत्नी उर्मिला हे दोघेही रविवारी सांयकाळी घरी होते. यावेळी खुशाल हा खाटेवर झोपला होता. यावेळी त्याच्या घरात तीन इसमानी प्रवेश करुन खुशालने विटा बांधकामासाठी पैसे घेतले आहेत. ते परत कर असे बोलले. झोपेत असलेल्या खुशाल कापगते यांना सोबत घेऊन गेले. सुमारे दीड तासानंतर मृताअवस्थेत असलेल्या खुशाल कापगते यांना त्याच्या घरी परत आणून खाटेवर झोपवून ते तिघेही इसम तिथून पसार झाले.
याबाबतची तक्रार पत्नी उर्मिला कापगते यांनी रात्री २.३० वाजताच्या सुमारास लाखांदूर पोलीस ठाण्यात केली. अपहरण व खूनाचे प्रकरण असल्याने याचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू तथा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश घुसर यांच्या नेतृत्वात पथकाने तपासाची चक्रे फिरवून गोपनीय माहितीच्या आधारे चार जणांना ताब्यात घेतले.
यात नयन नारायण हरोडे (३०) रा. वैशाली नगर नागपूर, दीपक माधव दरोठे (२८) रा. बिनाकी नगर नागपूर, ज्ञानेश्वर रमेश बावणे (२३) रा.किटाळी व दिगांबर गोपाल ताराम (४९) रा. पारडी ता. लाखांदूर यांना गजाआड करण्यात आले. पैशाच्या कारणावरुन खुशाल कागपते याला सोबत घेऊन गेले होते, असे बयाणात या चारही आरोपींनी कबुली दिली आहे.
या घटनेचा तपास दिघोरीचे सहायक पोलीस निरीक्षक यादव करीत आहेत. या कारवाईत पोलीस निरीक्षक सुरेश घुसर, सहायक उपनिरीक्षक यादव, सहायक फौजदार नेपालचंद टिचकुले, पोलीस हवालदार वामन ठाकरे, संजय कुंजरकर, रोशन गजभिये, दिनेंद्र आंबाडारे, बबन अतकरी, चेतन पोटे, अनूप वालदे, स्नेहल गजभिये, ठवकर यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)
खुशाल कापगते यांचा खून नेमक्या कोणत्या कारणासाठी आणि कोणत्या पध्दतीने करण्यात आला याची माहिती उत्तरीय तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होईल. सद्यस्थितीत या घटनेचा तपास सुरु आहे.
- सुरेश घुसर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा भंडारा