पालकांनो, जागरूक व्हा, बालकांना मोबाइलपासून दूर ठेवा !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 11:11 AM2024-09-11T11:11:53+5:302024-09-11T11:12:59+5:30
बालरोगतज्ज्ञांचा सल्ला: आरोग्यावर होताहेत विपरीत परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आधुनिक युगात संगणक व मोबाइलचा वापर वाढीस लागला आहे. स्क्रीन टाइम वाढल्याने डोळ्यांचे आजार वाढीस लागले आहेत. त्यातच अनेकजण बालकांच्या हातात मोबाइल देतात; परंतु असे करणे बालकांसाठी अहितकारक असल्याचे मत बालरोगतज्ज्ञांनी व्यक्त केले आहेत. पालकांनी, जागरूकता दाखवीत बालकांना मोबाइलपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
बालकाची ५ ते ६ वर्षे ही आरोग्यदृष्ट्या अत्यंत मोलाची असतात. शारीरिक, मानसिक व भावनिकदृष्ट्या हे वय त्याचे भविष्यातील व्यक्तिमत्त्व घडविणारे असते. मात्र, ही स्थिती सध्या दुरापास्त होत आहे. टीव्ही, मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, टेंब व इतर तांत्रिक उपकरणांनी त्यांना इतके आकृष्ट केले की, इतर आवश्यक नैतिक संस्कार मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे येणारी पिढी आरोग्यदृष्ट्या सुदृढ व मानसिकदृष्ट्या संस्कारित होईल की नाही, अशी भीती निर्माण झाली आहे. आधुनिक काळातील औषधे ही तात्पुरती ठीक असतात; परंतु त्या औषधाने प्रतिकारशक्ती वाढत नाहीत. यासाठी कुटुंबांनी जाणीवपूर्वक योग्य वेळ खर्च करणे क्रमप्राप्त झाले आहे. त्यातच बालकांना मोबाइलपासून दूर ठेवण्याची आवश्यक आहे.
त्रास टाळण्यासाठी मोबाइल देणे चुकीचे
लहान मुलं घरामध्ये सातत्याने आई-वडिलांना खेळण्यासाठी किंवा अन्य कोणत्या ना कोणत्या कारणासाठी त्रास देतात. त्यामुळे या त्रासातून सुटका व्हावी म्हणून अनेकजण बालकांच्या हाती मोबाइल थोपवून मोकळे होतात. पालकांनो, असे करणे अत्यंत चुकीचे व जोखमीचे आहे.
"बालकांना निरोगी ठेवण्यासाठी पालकांनी वैद्यकीय सल्ल्याने नैसर्गिक घटकयुक्त पदार्थ देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. लहान वयात मोबाइल अजिबात मुलांच्या हाती देऊ नये. मोबाइलचे गंभीर परिणाम आरोग्यावर होतात. मोबाइलचा अतिवापर मुलांना शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या पंगू बनवू शकतो. तांत्रिक उपकरणांपासून मुलांना दूर ठेवावे. त्याऐवजी मुलांना मैदानात खेळण्यासाठी, धावण्यासाठी पुरेसी मोकळीकता देणे हिताचे ठरते. शारीरिक आरोग्य ठणठणीत असावे."
- डॉ. शशांक क्षीरसागर, बालरोगतज्ज्ञ, भंडारा.
"लहान मुलांच्या खानपानावर विशेष लक्ष देणे गरजेचे असते. रासायनिकतेच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस खालावला आहे. पिकांवर फवारणीचा अतिवापर होत असल्याने अन्नधान्यावर विपरीत परिणाम होतो. नैसर्गिक घटकयुक्त आहार मिळेनासा झाला आहे. पालकांनी जैविक, नैसर्गिक अन्नपदार्थ व भाजीपाल्याचा वापर करून बालकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सकस आहार देण्याचा प्रयत्न व्हावा. यामुळे मुले शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होत असतात."
- डॉ. देवेंद्र फुले, बालरोगतज्ज्ञ, भंडारा.