पालकांनो, मुलांचा निकाल आनंदाने स्वीकारा ! अपेक्षांचे ओझे लादू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 12:04 PM2020-07-17T12:04:19+5:302020-07-17T12:05:27+5:30
आपण दहावी - बारावीच्या परीक्षेत किती गुण मिळविले होते याचे सिंहावलोकन करून पालकांवर अपेक्षांचे ओझे टाका. मुलांना प्रोत्साहित केले नाही तर त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होऊन तो भविष्यासाठी घातक ठरू शकतो.
ज्ञानेश्वर मुंदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : स्पर्धेच्या युगात प्रत्येक पालकाला आपल्या मुलाने पैकीच्या पैकी गुण मिळावावे अशी अपेक्षा असते. सर्वांनाच पैकीच्या पैकी गुण मिळणे शक्य नाही. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले तरी पालकांनो मुलांचा निकाल आनंदाने स्वीकारा. प्रोत्साहन देऊन त्यांना मार्गदर्शन करा. आपण दहावी - बारावीच्या परीक्षेत किती गुण मिळविले होते याचे सिंहावलोकन करून पालकांवर अपेक्षांचे ओझे टाका. मुलांना प्रोत्साहित केले नाही तर त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होऊन तो भविष्यासाठी घातक ठरू शकतो.
सध्या दहावी-बारावीचे निकाल घोषित होत आहेत. लॉकडाऊनने निकालाला विलंब झाल्याने प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांची उत्सूकता शिगेला पोहचली होती. मात्र गत दोन दिवसात सीबीएसई आणि राज्य परीक्षा मंडळाचे निकाल घोषित होत आहेत. विद्यार्थ्यांना भरभरून गुण मिळत आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारीही वाढत आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थीही परीक्षांमध्ये चांगले गुण घेत आहेत. मात्र अलिकडे स्पर्धेच्या युगात पालकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. प्रत्येकाला आपल्या मुलाने १०० पैकी १०० गुण मिळावे अशी अपेक्षा असते. बहुतांश पालक मुलांच्या अभ्यासाकडे सुरुवातीपासूनच लक्ष देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होते. मात्र निकाल घोषित झाल्यानंतर प्रत्येक पालकांच्या चेहऱ्यावर काहीसे वेगळेच भाव दिसून येतात. एखाद्या विद्यार्थ्याला ९० टक्के गुण मिळाले तरी पालक समाधानी दिसत नाहीत.
आपल्या मुलाला अधिक गुण मिळाले असते असे सांगताना दिसून येतात. कमी गुण मिळाल्याचे खापर शाळा, पाल्य आणि घरच्या मंडळीवरच फोडले जाते. मात्र आपल्या मुलाचा बुध्यांक नेमका किती होता, त्याने परीक्षेचा अभ्यास कशा पद्धतीने केला याचा विचार केला जात नाही.
विशेष म्हणजे वर्गातील इतर मुलांना आपल्या मुलापेक्षा अधिक गुण मिळाले तर आणखीनच खजील झाल्यासारखे पालकांना वाटते. अनेक पालक तर मुलांना रागावतानाही दिसून येतात. अलिकडे गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. दोन दशकापूर्वी ७० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्याचा पालक अभिमानाने मुलाचे कौतूक करायचा. परंतु आता ९५ टक्के गुण मिळाले तरी पालकाच्या मनात कुठेतरी अढी असते. यापेक्षा आणखी अधिक गुण मिळविणे अपेक्षित असतात. या सर्व प्रकारात पालक मात्र आपल्या दहावी-बारावीतील गुणांकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतो. कुणी याबाबत छेडले तर आमच्या काळी सुविधा नव्हत्या. नाही तर आम्हालाही चांगले गुण मिळाले असते असे सांगतात.
परीक्षेतील गुण म्हणजे यशाचे मापदंड नव्हे. कमी गुण घेणारे अनेक विद्यार्थी आयुष्यात मोठे झालेले दिसून येतात. तर अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी मागे पडलेले दिसतात. त्यामुळे दहावी बारावीच्या गुणावरून मुलांचे गुणांकन करू नका. जो काही निकाल आला असेल तो आनंदाने स्वीकारा आणि त्यांना प्रोत्साहन द्या.
गुणवंतांच्या कौतूकासोबत नापासांचे मनोबल वाढवा
परीक्षेत यश-अपयश येत असते. अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतूक केले जाते. त्यांना प्रोत्साहन दिले जाते. मात्र गुणवंतांचे कौतूक करताना परीक्षेमध्ये नापास झालेल्यांचे मनोबल वाढविण्याची गरज आहे. आधुनिक पिढीही अतिशय संवेदनशिल आहे. कुणाच्या मनावर कधी विपरीत परिणाम होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे कमी गुण मिळाले किंवा पाल्य नापास झाला तरी त्याला प्रोत्साहित करण्याची गरज आहे. नापास झालेला विद्यार्थी पुन्हा पास होऊन जीवनात मोठे ध्येय बाळगू शकतो. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना घरातून प्रोत्साहनाची गरज आहे. घरच्यांनीच त्यांना नाउमेद केले तर ते करणार तरी काय? गुणवंतांच्या कौतूकासोबतच नापासांचेही मनोबल वाढविणे तेवढेच महत्वाचे आहे.