गणवेश खरेदीसाठी होणार पालकांची धावपळ
By admin | Published: June 20, 2017 12:20 AM2017-06-20T00:20:05+5:302017-06-20T00:20:05+5:30
बाजारातून हलक्या दर्जाचा कपडा घ्यायचे म्हटले तरी एक मीटर कपड्यासाठी ५० ते १०० रुपये मोजावे लागतात.
मिळणार फक्त २०० रुपये : गणवेश निधी होणार बँक खात्यात जमा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : बाजारातून हलक्या दर्जाचा कपडा घ्यायचे म्हटले तरी एक मीटर कपड्यासाठी ५० ते १०० रुपये मोजावे लागतात. त्यामुळे मोफत गणवेश योजनेअंतर्गत येणाऱ्या २०० रुपयात ८ व्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी कापड विकत घेणे कठीण आहे. २०० रुपये कापडावरच खर्च झाल्यानंतर शिलाईचे काय? असा प्रश्न आता पालकांसमोर उपस्थित होत आहे.
पूर्वी शाळास्तरावरुन एकत्रितरीत्या कापड अथवा रेडीमेड ड्रेस खरेदी करण्यात येत होते. त्यामुळे २०० रुपयात गणवेश तयार होत होते. परंतु चालू शैक्षणिक वर्षापासून गणवेशाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे २०० रुपयांमध्ये गणवेशाचे कापड खरेदी करुन ते शिवण्याची कसरत पालकांना करावी लागणार आहे. दिवसेंदिवस महागाई झपाट्याने वाढत आहे, असे असतानाही दुसरीकडे सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत एका गणवेशाखाली २०० रुपये देऊन विद्यार्थ्यांची बोळवण केली जात आहे. मागील काही वर्षांपासून गणवेशाच्या रक्कमेत वाढ करण्यात आलेली नाही. परंतु गणवेशाचे पैसे शाळा स्तरावर देण्यात येत होते. या रक्कमेतून शाळा स्तरावरच एकत्रितरित्या गणवेश खरेदी करण्यात येत होते. अनेकवेळा सहावी, सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्यानंतर पैसे कमी पडत होते. अशावेळी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समिती, पदाधिकारी आर्थिक हातभार लावायचे. त्यामुळे पहिल्या दिवशी विद्यार्थी नविन गणवेशात शाळेत येत होते.
परंतू चालू शैक्षणिक वर्षापासून योजनेंतर्गत प्रत्येकी दोन गणवेशासाठी दिले जाणारे २०० रुपये हे विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे आता गणवेश खरेदीची जबाबदारी थेट पालकांच्या खांद्यावर आली आहे. एकीकडे एखादा रुमाल घ्यायचा असला तरी २५ ते ५० रुपये मोजावे लागतात. दुसरीकडे शासनाने २०० रुपयांमध्ये गणवेश खरेदी करण्याचा नवोपक्रम राबविला आहे. ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी ते खिशातून रक्कम टाकून गणवेश खरेदी करु शकतात. मात्र गावनिवाह विचार केल्यास अशा पालकांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. त्यांचे हातावर आणून पाणावर खाणे आहे, असे पालक जास्तीचे पैसे कुठून आणणार अशा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे शासनाने सध्याच्या बाजारपेठेतील दराचा विचार करुन गणवेशासाठी दिल्या जाणाऱ्या रक्कमेत वाढ करावी अशी मागणी पालकांकडून होत आहे.
शाळेतूनच गणवेश वाटप करावे
सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेतूनच मोफत पाठपुस्तकांचे वाटप करण्यात येते. त्याच धर्तीवर गणवेश वाटप करावे अशी मागणी पालकांकडून होत आहे. एकत्रितरित्या खरेदी केल्याशिवाय २०० रुपयांच्या बजेटमध्ये गणवेश बसत नाही. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम न टाकता खादी महामंडळाकडून गणवेशाचा कापड खरेदी करावा अशी मागणी होत आहे. हे जरी शक्य नसल्यास शाळेतूनच गणवेश वाटप करावे, अशी मागणी आहे.
जिल्हा परिषदेने वाटा उचलावा
मोफत गणवेशाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे आता पालकांना पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गणवेश केवळ २०० रुपयात खरेदी करावा लागणार आहे. महागाई लक्षात घेता. २०० रुपयात गणवेश मिळणे कठीण आहे व बँकेत पैशाच्या टंचाईने पालकांना २०० रुपयांसाठी मजूरी सोडून रांगेत उभे राहणे कठीण होईल. त्यामुळे कमी पडणाऱ्या रक्कमेचा वाटा जिल्हा परिषदेने उचलावा अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.