मुलामुलींवर पालकांनी दडपण आणू नये

By admin | Published: May 28, 2015 12:38 AM2015-05-28T00:38:20+5:302015-05-28T00:38:20+5:30

शिक्षणाच्या बाबतीत मुलामुलींवर स्पर्धा लादत, दडपण आणू नका. मुलांशी संवाद साधा, आपल्या स्वभावाला मुरड घाला.

Parents should not put pressure on their children | मुलामुलींवर पालकांनी दडपण आणू नये

मुलामुलींवर पालकांनी दडपण आणू नये

Next

अरुण रंधे यांचे प्रतिपादन : उन्हाळी शिबिराचा समारोप
भंडारा : शिक्षणाच्या बाबतीत मुलामुलींवर स्पर्धा लादत, दडपण आणू नका. मुलांशी संवाद साधा, आपल्या स्वभावाला मुरड घाला. आपला अधिक वेळ मुलांना द्या, त्यांना प्रेम द्या, आत्मविश्वास द्या, त्यांच्यात दडलेल्या सामर्थ्यांची तुम्हाला प्रचिती येईल. असे प्रतिपादन प्रा.अरुण रंधे यांनी केले.
सन १९९० पासून संस्कार चळवळीतील, सिनिअर विद्यार्थ्यांना ज्युनिअर विद्यार्थ्यांकरिता चालविलेल्या ग्रीष्मकालीन नि:शुल्क शिबिर मालिकेतील २५ व्या शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सिनिअर विद्यार्थी व मार्गदर्शकांचा स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योगपती रामविलास सारडा होते.
प्रास्ताविक शिबिर संयोजक प्रा.वामन तुरिले यांनी केले. याप्रसंगी त्यांनी चळवळीच्या २५ वर्षातील वाटचालींचा धावता आढावा घेतला. शिबिरे नि:शुल्क का? यावरही ते बोलले. शिबिराबाबत मनोगत रिद्धी पेटकर हिने व्यक्त केले. शिबिर प्रमुख शिल्पा नाकतोडे हिने शिबिराचा अहवाल सादर केला. संचालन संस्कार चळवळीतील ज्येष्ठ विद्यार्थी नितीन कारेमोरे यांनी केले. याप्रसंगी १५४ शिबिरार्थी व त्यांचे पालक इंद्रराज सभागृहात उपस्थित होते. समारोप कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तसेच संस्कार चळवळीला तन मन धनाने जुळलेले शिक्षणतज्ज्ञ प्रा.अरुण रंधे होते. त्यांनी शिबिरार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या शिबिरांतर्गत कार्यक्रमाचे कौतूक करीत, पालकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. अशाच शिबिरार्थी व त्यांच्या पालकांकरिता विद्यार्थ्यांचा अभ्यास व आरोग्य या विषयावर शिबिरात चर्चासत्र घेतले गेले. प्रमुख मार्गदर्शक, संस्कार शिबिराचे माजी विद्यार्थी डॉ.पराग डहाके होते. पालकांच्या अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिलीत. ते म्हणाले, मुलांना उपदेशाचे डोज पाजू नका. स्वत:चा आदर्श त्यांच्या समोर प्रस्थापित करा, त्यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शनही केले. शिबिरात जिल्हा सामान्य रुग्णालय भंडाराच्या वतीने डॉ. प्राची पातुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली घरगुती उपचराांवरील ३४ फलकांच्या प्रदर्शनीचा लाभ शिबिरार्थी व पालकांनी घेतला.
शिबिरात भाषणांऐवजी मार्गदर्शन व विद्यार्थ्यांच्या प्रकटीकरणावर भर होता. त्यामुळे विविध स्पर्धांमध्ये, पारितोषिकांचे मानकरी १३० शिबिरार्थी ठरले. शिबिरात रेखाचित्र रेखाटन स्नेहा नाकतोडे (मुंबई) व शरद लिमजे (भंडारा) यांनी शिकविले. संवाद कौशल्य व नाट्याबद्दल भारत सरकारचे थियेटर स्कॉलर मनोज दाढी यांनी मार्गदर्शन केले. विज्ञान गणित या कार्यक्रमात विज्ञान शिक्षक, वासुदेव मोहाडीकर व दिनेश ढोबळे यांनी प्रात्यक्षिके दाखविलीत. हा कार्यक्रम भंडारा येथील सर्व शाळांकरिता होता. टाकावूतून टिकावू बद्दलचे मार्गदर्शन महादेवराव साटोें यांनी केले. बोधकथा प्रा.नरेश आंबीलकर यांनी रूजविल्या. शिबिरात बालकांनी मुलाखत घेण्याचेही धाडस दाखविले.
मोकळ्या वातावरणात अरण्यवाचन हे संस्कारचे २५ वर्षात टिकलेले वैशिष्ट्ये आहे. यावर्षीही कोका अभयारण्यात वाघ, बिबट, चितळ, हरिण, रानगवा, अस्वल तसेच अनेक पशुपक्षी जवळून बघण्याची संधी शिबिरार्थ्यांना मिळाली. निसर्गमित्र अरविंद अभ्यंकर व वनविभाग यांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचा अरण्यवाचनाचा लाभ द्विगुणीत झाला. सहल अविस्मरणीय ठरली. आभार प्रा.नरेश आंबीलकर यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Parents should not put pressure on their children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.