काही असामाजिक तत्त्वांकडून पालक, शाळा व्यवस्थापनात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:29 AM2021-01-02T04:29:15+5:302021-01-02T04:29:15+5:30
भंडारा : काही असामाजिक तत्त्वे आपल्या राजकीय फायद्यासाठी पालक आणि शाळा व्यवस्थापनात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातून ...
भंडारा : काही असामाजिक तत्त्वे आपल्या राजकीय फायद्यासाठी पालक आणि शाळा व्यवस्थापनात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा खेळखंडाेबा हाेण्याची शक्यता आहे. शासनाच्या आदेशानुसारच ऑनलाईन शाळा सुरू असल्याची माहिती इंग्लिश स्कूल असाेसिएशने शुक्रवारी येथे आयाेजित पत्रकार परिषदेत दिली.
भंडारा शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या व सीबीएससी शाळाबाबत आंदाेलनाच्या माध्यमातून काहीजण गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यात २० वर्षांपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू आहे. जगभर येथून शिक्षण घेतलेले विद्यार्थी नाेकरी करीत आहेत. त्यांना काेणतीही समस्या निर्माण झाली नाही. मात्र आता विविध प्रश्न निर्माण करून या शाळांना संशयाच्या भाेवऱ्यात उभे केले जात आहे. प्राचार्य आणि कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती सरल व ओयासीस पाेर्टलवर उपलब्ध आहे. स्कूल रिपाेर्ट कार्डमध्ये सर्व मान्यता आहे. सर्व नियमांचे पालन केले जाते. तसेच शासनाच्या निर्देशानुसार ऑनलाईन शाळा सुरू आहे. पालकानी शुल्क भरले नाही तर या शाळांचे कार्य ठप्प हाेऊन जाईल, असे सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला सेंट मेरीस स्कूलच्या प्राचार्या बेबी थाॅमस, राॅयल पब्लिक स्कूलचे मधू सॅन्यूअल, तुमसरच्या एसएनएसचे बी. विमल, पवनीचे विजय मालवी, प्राईड काॅन्व्हेंटचे मुरलीधर भर्रे, एलपीएसचे डाॅ. आशिष पालीवार, सेंट पीटर्स फादर प्रकाश, युनिव्हर्सलचे एम. एस. शैजल, स्प्रिंग डेलच्या पाॅल, एमडीएमचे व्यास आणि वरठी येथील सनफ्लॅगचे प्राचार्य चाैबे उपस्थित हाेते.
बाॅक्स
शिक्षा बचाव समितीचे आंदाेलन
जिल्ह्यातील सीबीएसई शाळांच्या मनमानी कारभाराविराेधात गत १५ दिवसांपासून शिक्षा बचाव समितीच्या वतीने आंदाेलन सुरू आहे. भंडारा जिल्हा परिषदेसमाेर विद्यार्थ्यांसह सत्याग्रह करण्यात आला. सीबीएसई शाळा, आरटीई ॲक्टनुसार जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत येतात; परंतु येथील गैरकारभाराबाबत शिक्षणाधिकारी परस्पर दुर्लक्ष करीत असल्याचा आराेप शिक्षा बचाव आंदाेलनाचे जिल्हा संयाेजक नितीन निवाने आणि नागपूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांनी शुक्रवारी येथे आयाेजित पत्रकार परिषदेत केले. पालकांची फसवणूक करणाऱ्या शाळांवर प्रशासकांची नियुक्ती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.