मराठी साहित्यात भातशेतीचे प्रतिबिंब उमटले नाही

By Admin | Published: August 24, 2016 12:16 AM2016-08-24T00:16:31+5:302016-08-24T00:16:31+5:30

पूर्व विदर्भातील भंडारा - गोंदिया परिसरातील भातशेतीचे सांस्कृतिक व कृषक जीवन पुरेशा ताकदीने प्रतिबिंबीत झाले नाही.

Parsi reflection does not appear in Marathi literature | मराठी साहित्यात भातशेतीचे प्रतिबिंब उमटले नाही

मराठी साहित्यात भातशेतीचे प्रतिबिंब उमटले नाही

googlenewsNext

वामन तेलंग यांची खंत : विदर्भ साहित्य संघ भंडारा शाखेचा वर्धापन सोहळा
भंडारा : पूर्व विदर्भातील भंडारा - गोंदिया परिसरातील भातशेतीचे सांस्कृतिक व कृषक जीवन पुरेशा ताकदीने प्रतिबिंबीत झाले नाही. या परिसरातील सामान्य माणसाच्या जीवनातील घुसमट फार वेगळी असूनही या भागातून धग सारखी श्रेष्ठ सहित्यकृती निर्माण होऊ शकली नाही. या भागातील झाडीबोलीची चळवळ सुरेश द्वादशीवार, प्रभाकर सिरास यांचे कादंबरीलेखन या जमेच्या बाजू असल्या तरी अजनूही या मातीशी नाते सांगणारी सशक्त साहित्यकृती निर्माण होण्याची अजूनही गरज असल्याचे प्रतिपादन विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष वामनराव तेलंग यांनी केले.
विदर्भ साहित्य संघाच्या भंडारा शाखेच्या ४५ व्या वर्धापन समारंभाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रकाश एदलाबादकर, प्रमुख अतिथी म्हणून धनंजय दलाल, डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे, डॉ. अनिल नितनवरे, अ‍ॅड. सुधीर गुप्ते आदी मान्यवर मंचकावर उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रकाश एदलाबादकर यांचे संत साहित्य आणि आपण या विषयावर अत्यंत प्रभावी असे व्याख्यान झाले. मानवाने निष्काम, अहेतूक भावनेने कर्म करता करताच गंभीरपणे आत्मशोध घेणे हेच संत साहित्याचे खरे धर्म आहे. तसेच मराठीतील संतांच्या साहित्याचा आधुनिक काळातील मराठी साहित्यावर आणि जनमानसावरही मोठा प्रभाव पडला आहे. असे विचार एदलाबादकरांनी आपल्या भाषणातून मांडलेत.
पसायदान हे ज्ञानेश्वरांचेच नसून संत नामदेव, संत तुकाराम, संत रामदास, कवी मर्ढेकर, बा.भ. बोरकर, सुरेश भट यांनीही आपल्या शैलीतून विश्वमांगल्यासाठी पसायदान आहे, असे प्रतिपादन एदलाबादकर यांनी केले.
या वर्धापन सोहळ्याच्या प्रारंभी कवी सुरेश भटांचे मराठीगीत प्रा.राहुल भोरे यांनी सादर केले. शाखा सचिव प्रमोदकुमार अणेराव यांनी अहवाल वाचन केले. समारंभाध्यक्ष वामन तेलंग यांच्या हस्ते विदर्भ साहित्य संघाच्या नव्या सभासदांचे स्वागत करण्यात आले. प्रमुख अतिथी धनंजय दलाल यांनी, शुभेच्छापर भाषणात विदर्भ साहित्य संघाच्या भंडारा शाखेच्या वाङ्मयीन प्रवासाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
रेवाबेन पटेल महाविद्यालयाच्या संगीत विभागातील प्रा.राहुल मोरे, प्रा.संगीता वेगड, रेखा ठाकरे, प्रा.महेश पोगळ आणि लखन सावडकर या मंडळीनी संतांच्या विराणी व अभंगाचे सुश्राव्य गायन केले. मंत्रमुग्ध करणाऱ्या व वाङ्मयीन साहित्याची जाण या कार्यक्रमातून उपस्थितांना झाली.
शाखाध्यक्ष डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे यांनी प्रास्ताविकातून या सोहळ्याची पार्श्वभूमी विशद केली. या समारंभात थोर लेखिका महाश्वेतादेवी, डॉ.दिगांबर पाध्ये, कमलाकर बोरकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा. सुमंत देशपांडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रदीप गादेवारे यांनी मानले. सोहळ्याची सांगता पसायदानाने झाली. यावेळी भंडारा, लाखनी, तुमसर आणि साकोली परिसरातील साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Parsi reflection does not appear in Marathi literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.