खर्च केला जोमानं, हिशोब द्या दमानं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 02:10 PM2024-04-24T14:10:59+5:302024-04-24T14:13:24+5:30

Bhandara : निवडणुकीत कोणी किती उडवले पैसे; निकालानंतर २५ दिवसांनी सादर करा तपशील

parties have to give details of money spending in election | खर्च केला जोमानं, हिशोब द्या दमानं

खर्च केला जोमानं, हिशोब द्या दमानं

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
निवडणूक म्हटली की मतदारराजाला खूश करण्यासाठी उमेदवारांना हात सैल सोडावा लागतो. प्रत्येक खर्चाचा हिशोब ठेवावा लागतो. प्रचाराच्या रणधुमाळीत अनेकदा कोणाला किती रुपये दिले, किती खर्च झाले, याची नोंद ठेवणे उमेदवारांना कठीण होते. मात्र, निवडणूक आयोगास अंतिम हिशोब सादर करण्यासाठी निकाल जाहीर झाल्यापासून २५ दिवसांचा अवधी मिळणार आहे. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात पहिल्याच टप्प्यात निवडणूक झाल्याने जोमाने केलेल्या खर्चाचा हिशोब देण्यासाठी उमेदवारांना पुरेसा अवधी मिळणार आहे. या लोकसभा क्षेत्रात एकूण १८ उमेदवार नशीब आजमावत आहेत. नामनिर्देशनासोबत दिलेल्या शपथपत्रावरील माहितीनुसार यात काही उमेदवार कोट्यधीश, तर काही उमेदवार लखपती आहेत.

निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मर्यादेत खर्च होतो, की उमेदवार मर्यादेपेक्षा अधिक खर्च करतात, यावर नजर ठेवण्यासाठी भरारी पथके नेमण्यात आली होती. राजकारणात साम, दाम, दंड, भेद अशा सगळ्या आयुधांचा वापर केला जातो. अशावेळी वारेमाप पैसा खर्च करून मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रकार होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन यंत्रणा सतर्क होती.

यंदा १२ ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ

  • निवडणूक आयोगाने चहा, कॉफी, जेवण सभेतील प्रचार साहित्याचे दर ठरवून दिले होते. त्या मर्यादेत सर्वच उमेदवारांना पैसे खर्च करण्याची मुभा होती. याशिवाय जीएसटी बिलासह तपशील देणे बंधनकारक होते.
  • २०१९ च्या तुलनेत यावेळी १२ ते १५ टक्क्यांपर्यंत दरवाढ होती. त्याचा फटका मैदानात उतरलेल्या उमेदवारांना बसला आहे.
  • ९५ लाख रुपये खर्च करण्यास यावेळी लोकसभा निवडणूक उमेदवारांना परवानगी देण्यात आली होती.
     

खर्च निरीक्षकांनी घेतला आढावा
निवडणुकीत केलेल्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी खर्च निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. खर्चाच्या तपशिलाची पडताळणी करण्याकरिता स्वतंत्र कक्ष स्थापन केला होता. खर्च निरीक्षकांच्या सोबतीला जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली होती. या कक्षामार्फत उमेदवारांकडून खर्चाबाबत विविध नमुन्यात माहिती घेण्यात आली. त्याचा एकत्रित अहवाल केंद्र निवडणूक आयोगाला पाठविण्यात आला आहे. अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर २५ दिवसांच्या आत सादर करावा लागतो. पहिल्या टप्प्यात निवडणूक पार पडल्याने खर्चाचा हिशोब देण्यासाठी उमेदवाराकडे तब्बल ७० दिवसांचा अवधी शिल्लक आहे.


 

Web Title: parties have to give details of money spending in election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.