एसटी वाचून आता कुणाचे अडेना, सर्वांनी शोधले पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 03:41 PM2021-12-03T15:41:58+5:302021-12-03T15:50:39+5:30
संप मिटायची चिन्हे दिसत नाही आणि बाहेरगावी जाणेही तेवढेच महत्त्वाचे. त्यामुळे अनेकांनी पर्याय शोधला आहे. आता अनेकांना खासगी गाड्यांची सवय झाली आहे. दोन पैसे अधिक द्यावे लागत असले तरी एसटीवाचून कुणाचेच काम अडत असल्याचे सध्या तरी दिसत नाही.
भंडारा : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आणि राज्यातील प्रवासी वाहतूक ठप्प झाली. सुरूवातीच्या दोन आठवड्यांत प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. परंतु आता महिना उलटूनही संप मिटण्याची चिन्हे नाही. एसटीवाचून कुणाचे आता अडत नाही, असेच चित्र सर्वत्र आहे. बाहेरगावी जाण्यासाठी प्रत्येकाने पर्याय शोधला आहे.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी महिनाभरापासून संप सुरू आहे. भंडारा विभागातील सहा आगारातील प्रवासी वाहतूक ठप्प झाली आहे. तब्बल १२६५ कर्मचारी संपात सहभागी झाले आहे. दिवाळीच्या काळात प्रवाशांची एसटी बंद असल्याने मोठी धांदल उडाली. बाहेरगावी जाताना विचार करावा लागत होता. सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांना बाहेर जाणे कठीण झाले होते. परंतु आता संप मिटायची चिन्हे दिसत नाही आणि बाहेरगावी जाणेही तेवढेच महत्त्वाचे. त्यामुळे अनेकांनी पर्याय शोधला आहे. जवळपासच्या गावाला जाण्यासाठी दुचाकीचा आधार घेतला जात आहे. तर लांब पल्ल्याच्या ठिकाणी कार आणि खासगी वाहनातून प्रवास करीत आहे. आता अनेकांना खासगी गाड्यांची सवय झाली आहे. दोन पैसे अधिक द्यावे लागत असले तरी एसटीवाचून कुणाचेच काम अडत असल्याचे सध्या तरी दिसत नाही.
साकोली आगारातून दोन फेऱ्या
संपकाळात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बससेवा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला प्रतिसाद मिळत नाही. जिल्ह्यात केवळ साकोली आगारातून गत सहा दिवसांपासून दोन फेऱ्या दररोज निघत आहे. या सहा दिवसात एसटीला केवळ ३२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे आता प्रवासीही बसकडे येत नाही. सहा दिवसांत केवळ ६८४ प्रवाशांनी प्रवास केला आहे. ही स्थिती अशीच राहिली तर एसटी महामंडळ रसातळाला जाण्याची भीती आहे.
अपघाताची वाढली भीती
सुरक्षित प्रवासाठी एसटीकडे बघितले जाते. परंतु आता एसटी बंद असल्याने अनेक जण जीव धोक्यात घालून दुचाकीने प्रवास करतात. दोन दिवसांपूर्वी माहेरवरून नागपुकडे जाणाऱ्या एका दाम्पत्याच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. त्यात पत्नी जागीच ठार झाली. एसटीचा पर्याय असता तर त्या महिलेचा प्राण वाचला असता. राष्ट्रीय महामार्गावर नागपूर ते साकोलीपर्यंत दिवसभरातून शेकडो दुचाकी जीव मुठीत घेवून प्रवास करताना दिसतात.