सुपरफास्ट ३६ गाड्यांना थांबाच नाही; भंडारा रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2022 02:22 PM2022-10-26T14:22:20+5:302022-10-26T14:32:21+5:30
नागपूर किंवा गोंदियातून पकडावी लागते रेल्वे
भंडारा : मुंबई-हावडा मार्गावरील महत्त्वपूर्ण भंडारा रोड रेल्वे स्थानकावर सुमारे ३६ सुपर फास्ट आणि एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. सणासुदीच्या दिवसांत तर मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. प्रवाशांना नागपूर किंवा गोंदियातून रेल्वे पकडावी लागते. दोन मिनिटांच्या थांब्यासाठी गत अनेक वर्षांपासूनची मागणी असून अद्यापही लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या बिलासपूर झोन भंडारा रोड रेल्वे स्थानक येतो. बिलासपूरवरून सुटणाऱ्या गाड्या भंडारा रोड रेल्वे स्थानकावरून धडधड जातात. मात्र महत्त्वाच्या रेल्वे गाडीचे थांबे नाही. हावडा किंवा बिलासपूर वरून सुटणाऱ्या नवीन गाडीचे थांबे छत्तीसगड राज्यातील भिलाई, दुर्ग, राजनंदगाव, डोंगरगड येथे दिले गेले आहेत. गाडी महाराष्ट्रात दाखल होताच गोंदिया, इतवारी, नागपूर, येथे थांबा दिला जातो. मात्र तुमसर, भंडारा रोड आणि कामठी या स्थानकाला महत्त्व दिले जात नाही. भंडारा रोड आणि तुमसर येथून शेकडो प्रवासी प्रवास करतात. मात्र सुपर फास्ट गाड्यांना थांबा नसल्याने मोठा मनस्ताप होतो. आर्थिक भुर्दंडही बसतो.
भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या १५ लाख असून जिल्ह्याच्या भंडारा रोड आणि तुमसर हे दोन रेल्वे स्थानक आहेत. भंडारा, मोहाडी, लाखनी, साकोली, लाखांदूर, तुमसर, पवनी येथील प्रवाशांना नागपूर किंवा गोंदिया इथून प्रवास सुरू करावा लागतो. दोन मिनिटाचा थांबा मिळाल्यास जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांची सोय होऊ शकते. मात्र यासाठी कुणी पुढाकार घेत नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनी अद्यापपर्यंत याकडे लक्ष दिले नाही. आता रेल्वे मंत्रालयात आपले वजन वापरून भंडारा रोड स्थानकावर थांबे मिळवून देण्याची मागणी होत आहे. सुपरफास्ट व एक्सप्रेस थांबत नसल्याने प्रवाशी त्रस्त आहेत.
बिलासपूरच्या अधिकाऱ्यांकडून कायम उपेक्षा
पितळी भांडे, भाताचे कोठार आणि मॅग्निज खाणीसाठी भंडारा जिल्हा प्रसिद्ध आहे. भंडारा रोड स्थानकवरून अनेक सुपरफास्ट, एक्स्प्रेस गाड्या धावतात. मात्र भंडारा रोड स्टेशनवर गाड्या थांबत नाही. आतापर्यंत अनेकदा दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या बिलासपूर कार्यालयाकडे मागणी करण्यात आली. मात्र बिलासपूरच्या अधिकाऱ्यांनी कायम उपेक्षा केली आहे. भंडारा जिल्हा रेल यात्री सेवा समिती १०-१५ वर्षांपासून रेल्वे गाड्यांचे भंडारा रोडवर थांबा मिळण्यासाठी पाठपुरावा केला आहे. अनेक निवेदन देऊनसुद्धा गाड्यांचे थांबे मिळाले नाही.
'या' गाड्या थांबत नाही
भंडारा रोड स्थानकावरून जाणाऱ्या एलटीटी-शालिमार, रिवा-इतवारी, सिकंदराबाद-रायपूर, हटीया-पुणे, बिलासपूर-बिकानेर, बिलासपूर-भगत की कोटी, हटिया-एलटीटी, पोरबंदर-शालिमार, कोरबा-कोच्चूवेल्ली, कामाख्या-एलटीटी, संत्रागाची-पुणे, त्रिनुवेल्ली-बिलासपूूर, मालदा-सुरत, हावडा-साईनगर, बिलासपूर-पुणे, ओखा-शालिमार, पुरी-गांधीदान या अपडावून गाड्या थांबत नाही.