कालबाह्य वाहनातून प्रवासी वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 09:37 PM2018-11-25T21:37:49+5:302018-11-25T21:38:18+5:30
जिल्ह्यात सर्रास प्रवाशांची अवैध वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर धावत असून, याकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यातच अवैध प्रवासी वाहतूक करणारी अनेक वाहने कालबाह्य आणि भंगार असल्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात सर्रास प्रवाशांची अवैध वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर धावत असून, याकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यातच अवैध प्रवासी वाहतूक करणारी अनेक वाहने कालबाह्य आणि भंगार असल्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. या प्रकाराकडे पोलीस आणि परिवहन विभाग मात्र डोळेझाक करीत आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणारी अनेक वाहने जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर सुसाट वेगाने धावताना दिसतात. एका वाहनामध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट ते तिप्पट प्रवाशांना बसविण्यात येते. वाहनामध्ये कोंबून प्रवाशांना बसविल्यानंतर त्यानंतर वाहनाच्या व्दारावरही प्रवाशांना बसविण्यात येते. गेल्या कित्येक वर्षांपासून जीप, मिनीडोअर, आॅटोरिक्षा, काळी-पिवळी, क्रूझर यासह इतर वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. प्रवासी मिळविण्याच्या नादात ही वाहने भरधाव पळविली जातात. यातील अनेक वाहने तर १० ते १५ वर्षे जुनी आहे.
काही वाहने खिळखिळी झाली आहे; मात्र कशाचीही तमा न बाळगता चालक बिनधास्तपणे वाहन पळवित आहेत. अनेक वाहनांच्या आतील सर्व रचनाच बदलण्यात आली असून, अधिकाधिक प्रवासी नेता यावेत म्हणून प्रवाशांना धड बसताही येत नाही अशी आसने तयार करण्यात आली आहेत. नऊ आसन क्षमतेच्या वाहनात १५ ते २० प्रवासी कोंबले जातात, तर वाहनाच्या मागे आणि व्दारावर पाच ते सात प्रवासी दिसून येतात. चालकाच्या शेजारीही चार प्रवासी बसविले जातात. त्यामुळे चालकाला गेअर बदलविणेही अशक्य होते.
या प्रकारामुळे एखादवेळी भीषण अपघात घडून मोठी जीवित हानी होण्याची शक्यता आहे. हा सर्व प्रकार पोलीस आणि परिवहन विभागाला माहीत आहे; मात्र ते वाहनचालकांवर कारवाई करताना दिसत नाही. अनेक वाहनांवर तर विनापरवाना चालक वाहन चालविताना दिसतात. एक-दोन महिने कंडक्टर असलेला तरुण एका रात्रीतून चालक होतो आणि मोठ्या ऐटीत वाहन चालवितो. अशा तरुणांची सध्या मोठी गर्दी झाली आहे. भरधाव वेगाने वाहन चालविताना रस्ता कसा आहे याचीही तमा बाळगली जात नाही. रस्त्यातील खड्डयातून वाहन सारखे उसळत असते. एकीकडे जिल्ह्यातील बहुतांश मार्गावर जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांतून प्रवास करताना अनेकांना त्रास होत आहे. अशा स्थितीत कालबाह्य वाहनांतून प्रवास करताना जीव मुठीत ठेवावा लागतो.
प्रवासी मिळविण्यासाठी जीवघेणी स्पर्धा
प्रवासी मिळविण्यासाठी खासगी वाहनधारकांची जीवघेणी स्पर्धा सुरू असते. त्यासाठी ही वाहने वेगाने पळविण्यात येतात, तसेच एखादे वाहन ओव्हरटेक करून समोर गेले, की त्याच्यापुढे जाण्याची स्पर्धा लागते. अनेकदा प्रवासी मिळविण्यासाठी मारामाऱ्या होण्याचे प्रसंग विविध ठिकाणी घडले आहेत. या सर्व प्रकारांवर आळा घालण्यासाठी नियुक्त असलेले पोलिस कर्मचारीच त्या वाहनांमधून प्रवास करीत असल्याचे अनेकदा दिसतात.