प्रवासी वाहन पुलावरून कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 09:07 PM2018-02-22T21:07:19+5:302018-02-22T21:07:40+5:30
सनफ्लॅग बायपास पुलावर भरधाव प्रवासी वाहनाने एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. यात प्रवासी वाहन अनियंत्रित झाल्याने पुलावरून १५ फूट खाली कोसळले. या घटनेत १२ प्रवाश्यांसह दुचाकीस्वार आणि त्याची पत्नी गंभीर जखमी झाले.
ऑनलाईन लोकमत
वरठी: सनफ्लॅग बायपास पुलावर भरधाव प्रवासी वाहनाने एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. यात प्रवासी वाहन अनियंत्रित झाल्याने पुलावरून १५ फूट खाली कोसळले. या घटनेत १२ प्रवाश्यांसह दुचाकीस्वार आणि त्याची पत्नी गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारला दुपारी १.३० वाजताच्या सुमारास सनफ्लॅग कंपनी जवळील वरठी बायपास पुलावर घडली. प्रवाशी वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला असून वरठी पोलीस त्याच्या शोध घेत आहे.
तुमसर- भंडारा मार्गावर धावणारे प्रवासी वाहन एम. एच. ३६ - ५६२४ ने गुरुवारला दुपारी वरठी सनफ्लॅग कंपनी जवळ असलेल्या बायपास पुलावर विरुद्ध दिशेने येणाºया दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. दरम्यान वाहन अनियंत्रित झाल्यामुळे सदर वाहन पुलावरून खाली कोसळले. यावेळी प्रवाशी वाहनात २० च्या वर प्रवाशी असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. यावेळी वाहन चालक नशेत असल्याचे सांगण्यात येते. या घटनेत दुचाकीस्वार उमेश लांजेवार (४०) व त्याची पत्नी ज्योती लांजेवार (३५) रा. तुमसर गंभीर जखमी झाले. धडक दिल्यानंतर वाहन कोसळल्याने गाडीत असलेले १२ प्रवासी जखमी झाले. यात शंकर आंग्रे (३०), सुनीता आंग्रे (२७), श्रावण आंग्रे(०२), रा. भिखारखेडा, माया ठवकर (२६) रा. खापा, राजेश्वर मेश्राम (३२), शारदा मेश्राम (२५), सुरेख वंजारी (४०), अशोक वंजारी (१७) हेमलता वंजारी (३०) रा. पाचगाव, विनोद राखाडे (३५) रा. चिंचटेकडी, ज्योती लांजेवार,( ३५),रा तुमसर, जयात्रा भोयर (६०) रा. खैरलांजी यांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच वरठी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सुरेश ढोबळे घटनास्थळावर ताफ्यासह दाखल झाले. दरम्यान त्यांनी जखमींना प्राथमिक केंद्र वरठी येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. सध्या सर्व जखमींना भंडारा येथे हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.