प्रवाशांना वाटतो बसस्थानक असुरक्षित
By admin | Published: April 16, 2015 12:22 AM2015-04-16T00:22:49+5:302015-04-16T00:22:49+5:30
परीक्षा संपल्यामुळे शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे इतर गावाला जाण्यासाठी प्रवाशांच्या संख्येत
प्रवाशांमध्ये महामंडळाविरुद्ध रोष : भंडारा बसस्थानकात असुविधा, नियमित पोलीस बंदोबस्ताची गरज
भंडारा : परीक्षा संपल्यामुळे शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे इतर गावाला जाण्यासाठी प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. प्रवाशांची गर्दी पाहता राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना सोयी सुविधा पुरवणे आवश्यक आहे; परंतु यासेवा पुरविण्यात एसटी महामंडळ प्रशासन अपयशी ठरल्याचे मंगळवारी ‘लोकमत’ने प्रवाशांची मते जाणून घेण्यासाठी केलेल्या सर्व्हेक्षणात आढळून आले. वाढत्या भुरट्या चोऱ्या, पाकिट बेपत्ता होणे अशा विविध कारणामुळे बसस्थानक परिसर असुरक्षित बनल्याचे प्रवाशांच्या चर्चेअंती दिसून आले.
सुट्यांमुळे बसने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ पाहता राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्यात येतात का? या अनुषंगाने ‘लोकमत’ने मंगळवारला सर्व्हेक्षण केले. सर्व्हेक्षणादरम्यान भंडारा बस स्थानकावरील सोयी सुविधांबाबत प्रवाशांचे मत जाणून घेतले. यावेळी राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचे वास्तव समोर आले. बसने प्रवास करणे किती सुरक्षित आहे, याबाबत विचारले असता, ६५ टक्के प्रवाशांनी एसटीचा प्रवास सुरक्षित असल्याचे सांगितले. २२ टक्के प्रवाशांना एसटीचा प्रवास असुरक्षित वाटतो. आपत्कालीन परिस्थितीत बसमध्ये प्रथमोपचार सुविधा मिळत नसल्याचे ७५ टक्के प्रवाशांनी, तर बसची स्थिती पाहून प्रथमोपचार सुविधेबाबत विचारले असता २५ टक्के प्रवाशांनी मिळत नसल्याचे सांगितले. याशिवाय बस स्थानकावर उपलब्ध असलेल्या सुविधांबाबत विचारले असता ४५ टक्के प्रवाशांनी समाधानी नसल्याचे सांगितले. बसचे वेळापत्रक पाळले जाते कां? या प्रश्नावर ६२ टक्के प्रवाशांनी होय, तर ३८ टक्के प्रवाशांनी नाही, असे उत्तर दिले. प्रवाशांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधा व सुरक्षेच्या बाबतीत राज्य परिवहन महामंडळ किती सज्ज आहे, हे वास्तव सर्व्हेक्षणातून समोर आले. पोलीस सुरक्षेबाबत समाधानी आहात कां? या प्रश्नावर १२ टक्के प्रवाशांनी पोलीस सुरक्षा असल्याचे सांगितले, तर पोलीस सुरक्षा नसल्याचे ८८ टक्के प्रवाशांचे मत आहे. यासंदर्भात प्रवाशांची मते विचारात घेतले असता भंडारा बसस्थानक परिसरात चोरटे वाढले असून अनेक प्रवाशांचे पाकिट बेपत्ता होतात. त्यामुळे पोलीस सुरक्षा चोख करण्यात यावी, अशा अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या दिवसात अपघाताची शक्यता बळावली आहे. अशा परिस्थितीत अपघात झाल्यास प्रवाशांच्या उपचारासाठी प्रथमोपचार असणे गरजेचे असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
(लोकमत चमू)
चोरटे मस्त; पोलीस सुरक्षा सुस्त