पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:53 AM2018-10-21T00:53:22+5:302018-10-21T00:54:28+5:30
अर्ध्या महाराष्ट्राला तांदूळ पुरविण्याची क्षमता विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या चार जिल्ह्याची आहे. त्यामुळे या चारही जिल्ह्यावर अन्याय होऊ देणार नाही. यावर्षीही शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून धानाला बोनस जाहिर करू, असे आश्वासन..........
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : अर्ध्या महाराष्ट्राला तांदूळ पुरविण्याची क्षमता विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या चार जिल्ह्याची आहे. त्यामुळे या चारही जिल्ह्यावर अन्याय होऊ देणार नाही. यावर्षीही शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून धानाला बोनस जाहिर करू, असे आश्वासन अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि औषधी प्रशासन मंत्री गिरीष बापट यांनी श्रीराम सहकारी भात गिरणी साकोली येथे आधाभूत धान खरेदी केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी दिले.
यावेळी मंचावर आमदार बाळा काशीवार, नगराध्यक्ष धनवंता राऊत, उपाध्यक्ष तरूण मल्लानी, सभापती जगन उईके, माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, संस्थेचे अध्यक्ष पतीराम कापगते, उपाध्यक्ष हरिदास समरीत, संचालक महादेव कापगते, भोजराज कापगते, जगदीश कापगते, किशोर कापगते, परसराम कापगते, सेवकराम लांजेवार, अरुण बडोले, मनोहर कापगते, सुधाकर दिघोरे, अल्का समरीत, लीला कापगते, व्यवस्थापक गोपाल समरीत उपस्थित होते.
ना. बापट म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना शेतीच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत धानाला भाव मिळावा यासाठी यावर्षी धानाचे भाव मागच्यावर्षीपेक्षा वाढवून दिले. तसेच शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्या आहे.
आमदार बाळा काशीवार यांनी, धान खरेदी केंद्रावर कुठलाही भ्रष्टाचार होणार नाही, यासाठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे तसेच ज्याचे धान त्याच शेतकऱ्याला विकता यावे यासाठी आधी नोंदणी नंतरच धानाची वजन ही पद्धती यावर्षीपासून सुरू करण्यात आली. संचालन व आभार संचालक भोजराम कापगते यांनी केले. यावेळी प्रथम धान आणणारे शेतकरी म्हणून संजय साठवणे, मनीराम कापगते यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.