बावनथडी वितरिकेला फोडून स्वत:च्या शेतापर्यंत तयार केली पाटचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 05:00 AM2020-05-08T05:00:00+5:302020-05-08T05:00:44+5:30
बावनथडी (राजीवसागर) प्रकल्पाची वितरिका कारली-चिचोली शिवारातून जाते. सन २००७ मध्ये या वितरिकेचे बांधकाम करण्यात आले होते. परंतु तांत्रिक कारणामुळे येथील परिसरातील शेतशिवारात सिंचनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नव्हता. प्रथमच सन २०१९ मध्ये उन्हाळी धान पिकाला शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी वितरित करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : बावनथडी प्रकल्पाची वितरिका फोडून एका इसमाने स्वमालकीच्या शेतापर्यंत कच्ची वितरिका तयार करून सिंचनाकरीता पाणी वळते केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तालुक्यातील कारली-चिचोली वितरिकेवरील हा प्रकार चिचोली शिवारात घडला.
बावनथडी (राजीवसागर) प्रकल्पाची वितरिका कारली-चिचोली शिवारातून जाते. सन २००७ मध्ये या वितरिकेचे बांधकाम करण्यात आले होते. परंतु तांत्रिक कारणामुळे येथील परिसरातील शेतशिवारात सिंचनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नव्हता. प्रथमच सन २०१९ मध्ये उन्हाळी धान पिकाला शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी वितरित करण्यात आले होते.
चिचोली शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतात वितरिकेचे पाणी जात नसल्याने त्याने वितरिका फोडून स्वत:च्या शेतापर्यंत मातीची वितरिका तयार करून घेत पाणी पोहचविले आहे. शासन नियमानुसार कोणतीही पूर्वसूचना न देता वितरिकेला फोडणे हा गुन्हा आहे. संंबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. वितरीका फोडणाऱ्या सदर इसमावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.
बावनथडी प्रकल्प पूर्ण झाल्याने सिंचनाकरिता शेतकऱ्यांना पाणी मिळत आहे. सदर शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत नियमानुसार शासनाने वितरिका तयार करण्याची गरज होती.