रुग्णांची हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 11:25 PM2017-08-28T23:25:34+5:302017-08-28T23:26:40+5:30
ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे औषधी वितरकाची जागा अनेक दिवसापासून रिक्त असल्याने .....
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे औषधी वितरकाची जागा अनेक दिवसापासून रिक्त असल्याने तसेच सध्या कार्यरत असलेला औषधी वितरक वेळेवर येत नसल्याने रुग्णांना औषधी घेण्यासाठी तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते. अनेकांना भोवळ येऊन पडण्याचे प्रकार सुद्धा घडले आहेत. मात्र याकडे रुग्णालय प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना होताना दिसत नाही. ज्यामुळे रुग्णासह इतर नागरिकात रुग्णालय प्रशासनाविरोधात असंतोष पसरत आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देणे गरजेचे आहे.
शुक्रवारला सुटी असल्यामुळे शनिवार २६ आॅगस्टला ग्रामीण रुग्णालयात चांगलीच गर्दी होती. रुग्ण ९ वाजेपासून तपासणीसाठी आले होते. डॉक्टरांनी तपासणी करून औषधे लिहून दिली. मात्र १० वाजेपर्यंत औषधी वितरक आलाच नसल्याने औषधी घेण्यासाठी औषधी विभागासमोर रांगचरांग लागलेली होती. रुग्णांच्या नातेवाईकामध्ये तणाव वाढल्याने रुग्णालयाच्या एका कर्मचाºयाला औषधी वितरणासाठी तेथील वैद्यकीय अधिकाºयांनी कामाला लावले. प्रश्न असा की फार्मासीस्टच्या जागी ज्या कर्मचाºयाने औषधी वितरण केले ते नियमाला धरून होते की नाही. त्याला औषधीचे ज्ञान होते का? जर औषधी देताना चूक झाली व रुग्णाच्या जीवावर बेतले तर त्याला जबाबदार कोण हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. याकडे सुद्धा गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
औषधी वितरीत करणारा फार्मासिस्टची जागा तसेच एक्सरे टेक्निशियनची जागा अनेक दिवसापासून रिक्त आहे. मात्र ग्रामीण विभाग असल्याने या जागा भरण्यासाठी कोणीही प्रयत्न करीत नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण जनता म्हणजे अशिक्षितच व बिनकामाची असे तर शासन समजत नाही असा प्रश्न जागरूक नागरिक उपस्थित करीत आहेत. ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे सर्वाधिक शेतकरी व गरीब कुटुंबातील जनता उपचार घेण्यासाठी येतात. या रुग्णालयात जवळपास २० ते २५ गावातील नागरिक मोठ्या आशेने येथे येतात. परंतु येथे कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. शासन मोठ्या गर्वाने सामान्य जनतेच्या आरोग्याची हमी देणारी जाहिरात प्रकाशित करते. परंतु मोहाडी रुग्णालयातील अंधार त्यांना दूर करता आला नाही.
एक्स-रे मशीन धूळखात
ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे लाखो रुपयांची एक्सरे मशीन आहे. परंतु एक्सरे टेक्नीशियनची जागा रिक्त असल्याने ही मशिन धुळखात पडली आहे. हाडांचा थोडासा जरी उपचार करायचा असला तरी तालुक्यातील गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात किंवा जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जावे लागते. ज्यामुळे शेतकरी, शेतमजूर व गरीब रुग्णांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. शासनाने व त्यांच्या प्रतिनिधींनी याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे. फार्मासिस्ट व एक्सरे टेक्नीशियनची रिक्त जागा त्वरीत भरण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
एनसीडी केंद्र वाºयावर
मधुमेह व रक्तदाब तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे एनसीडी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. परिसरातील १०-१५ गावातील शेतकरी, शेतमजूर व गरीब परिवारातील नागरिक येथे तपासणीसाठी येतात. मात्र या केंद्राची टेक्निशियन कधीही वेळेवर येत नाही. नागरिकांची मधुमेह व रक्तदाब तपासणी ही सहायीका स्वत: करते. एनसीडी केंद्र उघडण्याची वेळ ९ वाजताची असताना टेक्निशियन ही ११ किंवा १२ वाजेपर्यंत येथे येते व १ वाजता स्वाक्षरी करून निघून जाते. या बाबीकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे.
फार्मासिस्टची जागा रिक्त असल्यामुळे आरबीएसके (शालेय आरोग्य तपासणी पथक)तील फार्मासिस्टला औषध वाटप करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. आता ती जागा भरण्यात आली असून फार्मासिस्ट लवकरच रूजू होईल व ही समस्या राहणार नाही.
-हंसराज हेडाऊ, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, मोहाडी.