कोरोनाबाधित रुग्णांना मानसिक आधाराची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:32 AM2021-04-26T04:32:13+5:302021-04-26T04:32:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : एक-एक गाव, प्रभाग कवेत घेताना कोरोनाने रुग्णांसह बाधित नसणाऱ्यांनाही मानसिकदृष्टया कमकुवत बनवले आहे. अशा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : एक-एक गाव, प्रभाग कवेत घेताना कोरोनाने रुग्णांसह बाधित नसणाऱ्यांनाही मानसिकदृष्टया कमकुवत बनवले आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना मानसिक आधाराची आवश्यकता आहे. परंतु, जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या समुपदेशनाची कुठलीही सुविधा नाही. कोविड केअर सेंटरच काय जिल्हा रुग्णालयातही रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही.
जिल्ह्यात महिनाभरापासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तसेच आसपास घडणाऱ्या कोरोनाशी संबंधित घटनांमुळे सर्वचजण भयभीत झाले आहेत. कोरोना झाला, असे माहीत जरी झाले तरी रुग्णांसह घरातील मंडळींचेही अवसान गळून जाते. कुठे जावे, कुणाकडे उपचार घ्यावे, प्रकृती कशी आहे अशा अनेक शंका मनात येतात. अलीकडे तर रुग्णालयात खाटा, ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा अभाव रुग्णांच्या मानसिकतेवर विपरित परिणाम करत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण मानसिकदृष्ट्या खचल्याचे पाहायला मिळत आहे.
कोरोना संसर्गानंतर रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तेथेही कोणताच मानसिक आधार दिला जात नाही. कामाच्या ताणाने डाॅक्टर आणि परिचारिकांचीही चिडचिड वाढलेली दिसते. रुग्णांवर ओरडणे, नातेवाईकांना योग्य माहिती न देणे, असे प्रकार सुरु आहेत. यातून मग डाॅक्टर आणि नातेवाईकांमध्ये वादही होत आहेत. अनेकदा रुग्णालयात असलेल्या सुविधांचा अभावही रुग्णांना मानसिकदृष्ट्या कमकुवत करण्यास कारणीभूत ठरतो. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. आसपासचे रुग्ण जेव्हा कोराेनाने मृत्यूमुखी पडतात, तेव्हा त्याठिकाणी उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधिताला जबर मानसिक धक्का बसतो. अनेकजण तर खाणे-पिणेही सोडून देतात. नातेवाईकांना आतमध्ये येता येत नाही आणि डाॅक्टर रुग्णांची आस्थेने विचारपूस करत नाही, अशी अवस्था आहे.
हा सर्व प्रकार टाळण्यासाठी आणि रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी समुपदेशकाची गरज आहे. कोविड वाॅर्डात दाखल असलेल्या रुग्णांना सातत्याने मार्गदर्शन करणे आणि त्यांच्याशी आपुलकीने वागणे गरजेचे आहे. तसेच मानसोपचार तज्ज्ञांकडून वेळोवेळी मार्गदर्शनाचीही गरज आहे.
बाॅक्स
भरती रुग्णांची स्थिती कळावी नातेवाईकांना
कोविड वाॅर्डात भरती रुग्णांची काय स्थिती आहे, याची कोणतीही माहिती रुग्णालयाबाहेर असलेल्या नातेवाईकांना मिळत नाही. त्यामुळे त्यांची दिवसभर तगमग सुरु असते. हा प्रकार टाळण्यासाठी टीव्ही माॅनिटरिंग करण्याची गरज आहे. जिल्हा रुग्णालयाच्या एखाद्या कक्षात टीव्ही लावून त्यावर वाॅर्डातील सीसीटीव्ही कॅमेराद्वारे प्रसारण केले तर आपला रुग्ण कसा आहे, हे नातेवाईकांना दिसेल. यासाठी काही वेळ निश्चित करावी. त्यावेळेत सर्व रुग्ण दिसतील अशा पद्धतीने दहा ते १५ मिनिटे प्रसारण केल्यास रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनाही दिलासा मिळेल. यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्याचे प्रसारण करण्याची गरज आहे.