कारेमोरे, भोंडेकरांपेक्षा पटोलेंनी विधानसभेत विचारले सर्वाधिक प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 01:08 PM2024-10-14T13:08:09+5:302024-10-14T13:21:11+5:30

Bhandara : संपर्क संस्थेचा अहवाल जाहीर, सर्वाधिक प्रश्नांचा भडिमार आरोग्य विभागातील

Patole asked more questions in the assembly than Karemore, Bhondekar | कारेमोरे, भोंडेकरांपेक्षा पटोलेंनी विधानसभेत विचारले सर्वाधिक प्रश्न

Patole asked more questions in the assembly than Karemore, Bhondekar

इंद्रपाल कटकवार 
लोकमत न्यूज नेटवर्क 
भंडारा :
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित होण्याचे काउंटडाऊन सुरू झाले असतानाच १४ व्या विधानसभेच्या २०१९ ते २०२४ या पंचवार्षिक कालावधीत भंडारा जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनी तब्बल ५५३ प्रश्न विचारले आहेत. यात आमदार नरेंद्र भोंडेकर, आ. राजू कारेमोरे यांच्यापेक्षा आ. नाना पटोले यांनी सर्वाधिक प्रश्न विचारले आहेत. उल्लेखनीय म्हणजे आरोग्य विभागासह शालेय शिक्षण, मनुष्यबळ व बालकांच्या संबंधित सर्वाधिक प्रश्न विचारण्यात आले. 


आजपर्यंतच्या भंडारा जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रातून कुणीही महिला आमदार प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पोहोचलेल्या नाहीत. लोकशाहीत लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा करताना त्यांच्या नेमक्या जबाबदाऱ्या काय? लोकप्रतिनिधींना आपण कशासाठी निवडून दिले? याबाबत माहिती होणे अपेक्षित आहे. जनतेच्या प्रश्नांना विधानसभेत काय वाचा फोडली, याचीही शहानिशा होत असतो. यासंदर्भात संपर्क संस्थेने १४ व्या विधानसभेबाबत आमदारांनी केलेल्या कार्याचाही ऊहापोह करण्यात आला. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या किती प्रश्नांवर आवाज उठवला, या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले. १४ व्या विधानसभेत एकूण ५ हजार ९२१ प्रश्न विचारण्यात आले होते. भंडारा जिल्ह्यातील तीन आमदारांनी विधिमंडळात एकूण ५५३ प्रश्न विचारले. जिल्ह्याच्या प्रश्नांची टक्केवारी ९.३४ टक्के इतकी राहिली. आहे. 


भंडारा जिल्ह्यातील आमदारांनी कोणते प्रश्न विचारले
जिल्ह्यातील साकोली तुमसर व भंडारा विधानसभा क्षेत्रातील आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांतर्गत अपघात संदर्भात ७ प्रश्न, व्यसनाबाबत ९, पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सुविधा ३, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत ८, गुन्हा अंतर्गत ८, संस्कृती भाषा साहित्यअंतर्गत ३, दिव्यांग संदर्भात ६, रोजगार व उपजीविका संदर्भात २, शेतकरी प्रश्नांवर ४६, अन्न संबंधित ४, जंगल व वन्यजीववर ६, उच्चशिक्षणावर १७, गैरव्यवहार गैरकृत्य व गैरवर्तनावर २९, उद्योग कारखाने गिरणी यावर ८, मूलभूत सुविधांवर ४२, तर मागासवर्गीय अनुसूचित जमाती जाती- विमुक्त जाती व भटक्या जमातीतील समस्यांसंदर्भात ११ व इतर १२ प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्यात आले. 


हे प्रश्न विसरले... 
जिल्ह्यातील तीनही आमदारांपैकी कुणीही वृद्ध व्यक्ती, अल्पसंख्याक, मच्छिमार यावर आधारित प्रश्न विचारलेले नाहीत. 


शालेय शिक्षणासंदर्भात सर्वाधिक प्रश्न 
शालेय शिक्षणाची संबंधित ४४ प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यातील शिक्षकांच्या अंतर्गत बदल्यांमध्ये झालेला गैरव्यवहार भंडारा येथील शहरातील ऐतिहासिक वारसा असलेल्या लालबहादूर शास्त्री जिल्हा परिषदेच्या शाळेचा भूखंड बांधा वापरा हस्तांतरित केलेले प्रकरण, महर्षी विद्या मंदिर बेला या शाळेतील गैरव्यवस्थापन, खाजगी शाळांच्या शुल्कवाढीवर नियंत्रण ठेवण्याबाबतचा प्रश्न, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम अदा करण्याबाबत, अपंग शाळांमधील अपूर्ण मनुष्यबळ, मध्यान्ह भोजनाबाबत प्रलंबित अनुदान आदी मुद्दे उपस्थित करण्यात आले होते.


पटोलेंनी मांडले ४७१ प्रश्न 
साकोली विधानसभेचे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातून विधानसभेत सर्वाधिक प्रश्न उपस्थित केले आहेत. मागील पाच वर्षांत त्यांनी ४७१ प्रश्न उपस्थित केले. भंडाऱ्याचे (पूर्वी अपक्ष) सध्या शिंदेसेनेत असलेले आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी ७२ प्रश्न विचारले असून सर्वात कमी प्रश्न आमदार राजू कारेमोरे यांनी ३३ प्रश्न विचारले.

Web Title: Patole asked more questions in the assembly than Karemore, Bhondekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.