आनंदनगरात पाण्यासाठी पायपीट
By admin | Published: April 11, 2016 12:28 AM2016-04-11T00:28:54+5:302016-04-11T00:28:54+5:30
दूषित पाणीपुरवठ्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे अनेक प्रकरणे दिवसेंदिवस समोर
भंडारा: दूषित पाणीपुरवठ्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे अनेक प्रकरणे दिवसेंदिवस समोर येत असतानाच गत १५ दिवसांपासून आनंद नगर तसेच एलआयजी व एमआईजी कॉलनीमध्ये पाणीपुरवठा होत नसल्याचे लक्षात आले. यापूर्वी म्हाडा कॉलनीतील नळाला दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार नगरसेवक महेंद्र निंबार्ते यांच्याकडे नागरिकांनी केली होती. ते प्रकरण पूर्ण होत नाही तर पाणीपुरवठा होत नसल्याचे दुसरे प्रकरण समोर आले आहे.
भंडारा शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा पूर्णत: कोलमडल्याचे चित्र सदर प्रकरणातून दिसून येते. काही वर्षापुर्वी पाणीपुरवठा मुबलक होत नसल्यामुळे तीन कोटी रुपये खर्च करून चेतन बंधारा बांधण्यात आला होता. त्यावेळी दोन वर्षात गोसेखुर्दचे काम पूर्ण होणार असतांनाही चेतन बंधारा बांधण्याचा घाट घालण्यात आला होता. चेतन बंधारा बनून सुद्धा नागरिकांना पाणी पुरवठा होत नव्हता. आता मात्र नदी तुडूंब भरली असतांनाही तीच परिस्थिती असणे आश्चर्यकारक बाब आहे.
शहरातील आनंदनगर येथे नगरपालिकाकडून पाणी पुरवठा केल्या जाते. सद्या उन्हाळ्याचे दिवस असून नळाला पुरेसा प्रमाणात पाणी येत नाही. आनंदनगरात अनेकांच्या घरी पाणीपुरवठासाठी नळ लावण्यात आले आहेत. मात्र, नळाला पाणी येत नसल्याने येथील महिला पुरुषांना इतरत्र पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची तात्काळ दखल घेवून आनंदनगरातील पाण्याची समस्या सोडविण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक महेंद्र निंबार्ते यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)