पवनीतील पर्यटन संकुल दुर्लक्षित
By admin | Published: March 19, 2016 12:31 AM2016-03-19T00:31:09+5:302016-03-19T00:31:09+5:30
ऐतिहासिक महत्व असलेल्या पवनी नगरात पर्यटकांची रेलचेल वाढली तर विश्रांतीची सोय व्हावी,...
पवनी : ऐतिहासिक महत्व असलेल्या पवनी नगरात पर्यटकांची रेलचेल वाढली तर विश्रांतीची सोय व्हावी, म्हणून बालसमुद्र तलावाचे तटावर दहा वर्षापुर्वी अडीच कोटी रूपयांची तरतूद करून पर्यटन संकुलाचे बांधकाम करण्यात आले. परंतु राजकीय व प्रशासनाचे उदासीन धोरणामुळे पर्यटन संकुल दुर्लक्षित राहिले. त्याची दुरावस्था झाली. पर्यटकांना इमारतीचा उपयोग होण्याचे ऐवजी कोट्यवधीची इमारत धुळखात पडलेली आहे.
बालसमुद्र तलावाचे तटावर एका बाजुला पर्यटन संकुल व दुसऱ्या बाजुला भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित केलेला किल्ला आहे. अशा अत्यंत रमणीय ठिकाणी सन २००४ मध्ये पर्यटन संकुलाचे भूमिपूजन करण्यात आले. साधारणत: सन २००७ पासून संकुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. पर्यटन संकुलाचा आराखडा तयार करताना परिसरात बगिचा व बालसमुद्रात बोटींगची व्यवस्था करता येईल, असे दर्शविण्यात आले होते. परंतू आराखडा बदलत गेला व संकुलाशिवाय इतर सुविधा होऊ शकल्या नाही.
कंत्राटदाराने कसेतरी संकुल बांधून तयार केले. कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने संकुलाचे छत व त्याखाली केलेले पीओपीचे सिलिंग तुटून पडले. अद्यापही ते तसेच आहे. विद्युतीकरण, सैनीटेशन, पाण्याची व्यवस्था फर्निचर अशा कोणत्याच सुविधा परिपूर्ण झालेल्या नाहीत. इमारतीच्या परिसरात कचरा उगवलेला आहे. शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने कोट्यवध रूपये खर्च करून ऐवढे दुर्लक्ष कां केले हे समजण्यास मार्ग नाही. पवनीच्या विकासात लोकप्रतिनिधी व प्रशासनाची भूमिका ताठर नसल्याने विकास खुंटलेला आहे, अशी चर्चा होत आहे. पर्यटन संकूल आहे त्या स्थितीत खाजगी समुहाकडे हस्तांतरीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. पर्यटन संकूल पर्यटकांसाठी सुरू व्हावे, अशी मागणी होवू लागली आहे. (तालुका प्रतिनिधी)