पवनी, तुमसरात दुष्काळाचे सावट

By admin | Published: September 11, 2015 12:58 AM2015-09-11T00:58:25+5:302015-09-11T00:58:25+5:30

श्रावण महिना संपत असला तरी वरूण राजाची मुक्त हस्ताने हजेरी लागलेली नाही. परिणामी धान्याचे कोठार समजल्या जाणाऱ्या ...

Pawan, you have a drought | पवनी, तुमसरात दुष्काळाचे सावट

पवनी, तुमसरात दुष्काळाचे सावट

Next

हजारों एकर शेतजमिनीला पडल्या भेगा, पावसाअभावी उत्पादन घटण्याची शक्यता
तुमसर/ पवनी : श्रावण महिना संपत असला तरी वरूण राजाची मुक्त हस्ताने हजेरी लागलेली नाही. परिणामी धान्याचे कोठार समजल्या जाणाऱ्या तुमसर तथा चौरास भागातील पवनी तालुक्यात दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे.
शेतीत सिंचनाचे कोणतेही माध्यम आता उपलब्ध नसल्याने हजारो एकर शेतजमिनीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना धान उत्पादन होणार असल्याची आशा धुसर झाली आहे.
तुमसर तालुक्यात चिचोली हे गाव जंगलव्याप्त आहे. या गावात दोन मोठे रानतलाव आहेत. पावसाळा सुरू होताच जंगलवाटे या तलावात पाणी जमा होवून ते तुडूंब भरतात. या दोन तलावाच्या पाण्याने शेकडो हेक्टरातील पिक ओलीताखाली येवून शेतकरी धानाचे उत्पादन घेतात. मात्र तीन महिन्यांचा कालावधी संपून जात असतानाही पावसाने हजेरी लावली नाही. चिचोली मोकोटोला या गावातील शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करणारे रानतलाव कोरडेच आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी शेतजमिन पडीकच ठेवली. काही मुबलक शेतकऱ्यांकडे सिंचनाचे साधन, सुरूवातीला पावसाची हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. शेतविहीरद्वारे मोटारपंप लावून प्रसंगी ट्रॅक्टर चालवून शेतमजुरांना अधिकचे पैसे मोजून रोवणी उरकवली. पाऊस आज येणार उद्या येणार, या आशेने शेतविहीरीतील पाणी सिंचनकरून जगविले. मात्र पावसाने काही कृपादृष्टी दाखविलीच नाही. उलट शेतविहरी कोरड्या पडल्याने व तळ गाठल्याने शेतपिकांना जगविणे कठिण झाले आहे.
पाऊस येणार, शेतीला पाणी मिळणार व उत्पन्न मिळणार, या आशेने शेतकऱ्यांनी सोसायट्या, पतसंस्था, सावकारांकडून, बँकांकडून कर्ज घेतले. शेतीच्या मशागतीकरिता, रोवणीकरिता तसेच रासायनिक खताकरिता अतोनात पैसे खर्च केले. मात्र पावसाने दगा दिल्याने तलाव विहीर कोरडे पडले आहेत. सिंचनाअभावी शेतकऱ्यांनी लावलेली पिके पिवळसर पडून करपली असताना शेत जमिनीत आता भेगा पडल्याचे विदारक चित्र आहे. चिचोली येथील सुरेश काळसर्पे, बाबु हेडावू, अजय चंद्रीकापुरे, विलास रहांगडाले, भगवान मोहनकर, ईश्वर काळसर्पे, वामन गाढवे, रामचंद्र मोरे, फकिरा उके आदी शेतकऱ्यांनी चांगले उत्पन्न होणार, या आशेने होत नव्हते ते सर्व पणाला लावून आतापर्यंत शेती कशी बशी जगविली. त्यातही अतोनात पैसा खर्च घालावा लागला आहे.
पवनी : तालुक्यात भातपीक व सोयाबीन पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून पाऊस अनियमित असल्याने भातपिकाची रोवणी व सोयाबीन पिकाची पेरणी प्रभावित झालेली होती. शेकडो हेक्टर शेती अजूनही पडीत आहे त्याची आकडेवारी गोळा करण्यात आलेली नाही. ज्या शेतीमध्ये रोवणी व पेरणी केलेली आहे, त्या शेतीला पावसाची नितांत गरज आहे. परंतु पाऊस पडत नाही त्यामुळे शेततळी, तलाव, बोड्या, विहिरी, नहर अशा ज्या स्त्रोतात पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणचे पाणी इंजिनद्वारे देवून शेतातील पिक वाचविण्याचा शेतकरी आटोकाट प्रयत्न करीत आहे.
तालुक्यात सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेततळी, तलाव किंवा बोड्यांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध नाही. तरीही उपलब्ध पाणीसाठा वापरून शेतकरी पुढे पाऊस येईल, या आशेवर पिक जगविण्यासाठी पाणी देत आहे. भातपिकासाठी आतापासून पिक कापणीला येईस्तोवर चार ते पाच वेळा पाणी देण्याची गरज आहे. परंतु तलाव बोड्यांमध्ये तितका पाणीसाठा उपलब्ध नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. पाऊस न पडल्यास दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शेतकरी पावसाअभावी जसा त्रस्त आहे तसाच भात व सोयाबीन पिकावर आलेल्या वेगवेगळ्या किडींच्या प्रादुर्भावामुळे देखील त्रस्त आहे. गरजेनुसार रासायनिक खताची मात्रा देवून पिकाला संजीवनी देण्याचा प्रयत्न करीत असताना पिक वाचविण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. दुबारपेरणीमुळे खचलेला व कर्जबाजारी झालेला शेतकरी अन्नधान्याच्या उत्पादनासाठी तडफडत असताना शासनाच्या ‘स्मार्ट सिटी’ चा प्रसार पाहून राज्य किंवा केंद्र सरकार ‘स्मार्ट व्हिलेज’ करण्यासाठी प्रयत्न करणार आहे काय? असा सवाल करू लागला आहे.
(शहर/तालुका प्रतिनिधी)

Web Title: Pawan, you have a drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.