विस्तारीकरणात पवनी-भंडारा राज्यमार्ग उजाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:51 PM2019-03-11T22:51:32+5:302019-03-11T22:51:48+5:30
विकास हवा असेल तर तडजोड करावीच लागते. मात्र विकासाच्या नावाखाली वनराईवर कुऱ्हाड चालविणे कितपत योग्य आहे. आता हेच बघा ना भंडारा-पवनी मार्गाच्या विस्तारीकरणात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांवर कुऱ्हाड चालली. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात फुलणाऱ्या गुलमोहरालाही विकासाने दृष्ट लावली.
विशाल रणदिवे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : विकास हवा असेल तर तडजोड करावीच लागते. मात्र विकासाच्या नावाखाली वनराईवर कुऱ्हाड चालविणे कितपत योग्य आहे. आता हेच बघा ना भंडारा-पवनी मार्गाच्या विस्तारीकरणात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांवर कुऱ्हाड चालली. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात फुलणाऱ्या गुलमोहरालाही विकासाने दृष्ट लावली.
भंडारा-पवनी हा राज्यमार्ग ४० किमीचा असून या रस्त्याच्या विस्तारीकरणाला प्रारंभ झाला आहे. विस्तारीकरणात सर्वात पहिली कुऱ्हाड पडली ती गर्द सावली देणाऱ्या विविध प्रजातीच्या वृक्षांवर या मार्गावर जागोजागी आंबा, चिंच, कवट, कडूनिंब, गुलमोहर अशी वृक्ष होती. निसर्गाचा हा अनमोल खजाना गेल्या कित्येक वर्षापासून वाटसरूंना सावली देत होता.
ब्रिटीशांच्या काळात दूरदृष्टीने लावलेली ही वनराई सौंदर्यात भर घालणारी होती. परंतु आता या वृक्षांवरच कुºहाड चालली. ऐन उन्हाळ्यात हा रस्ता उजाड झाला आहे. कधीकाळी गर्द सावली देणाºया या रस्त्यावर आता सावलीसाठी वृक्ष शोधण्याची वेळ आली आहे.
२०१८ मध्ये कारधा टोलनाका ते निलज फाटा या रस्त्यावरील दोन्ही बाजूचे शेकडो जुने डेकेदार वृक्ष तोडण्यात आले. मुळासकट हे वृक्ष उखडून काढण्यात आले. शेकडो वर्षांपासून सावली देणारे हे वृक्ष आहा दिसेनासे झाले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात केशरी रंगाने फुलणारे गुलमोहरही आता दिसेनासे झाले आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात प्रवास करतांना प्रवाशांना या मार्गावरुन सावलीचा आधार होता. परंतु आता विस्तारीकरणाने वृक्ष तोडण्यात आले. त्यामुळे आता सावली मिळणे कठीण झाले आहे. या विस्तारीकरणाचा मार्गावर दुतर्फा वृक्षारोपण करावे अशी मागणी वृक्षप्रेमी करीत आहेत.
वृक्षारोपणाकडे दुर्लक्ष
रस्त्याच्या विस्तारीकरणात दुतर्फा असलेली झाडे क्षणात तोडली जातात. मात्र त्यानंतर या रस्त्यावर वृक्षारोपण होत नाही. वृक्षारोपण झाले तरी त्याची योग्य देखभाल होत नाही. जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचा असाच अनुभव आहे. त्यामुळे भंडारा-पवनी या राज्य मार्गावरही आता वाटसरूंना भविष्यात सावली मिळणार नाही.