पवनीचे विस्तार अधिकारी निलंबित
By Admin | Published: January 21, 2017 12:30 AM2017-01-21T00:30:02+5:302017-01-21T00:30:02+5:30
पवनी पंचायत समितीअंतर्गत २५ बायोगॅस सयंत्र बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.
बायोगॅस सयंत्र लक्षांक प्रकरण
भंडारा : पवनी पंचायत समितीअंतर्गत २५ बायोगॅस सयंत्र बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, वर्षभरात लोकांना योजनांची माहिती न देता उद्दिष्टपूर्ती करण्याऐवजी केवळ एक यंत्र बांधले. यासोबतच वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करणे या आरोपाखाली पवनीचे विस्तार अधिकारी (कृषी) बी. आर. भोयर यांना आज तडकाफडकी निलंबीत केले. ही कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी केली.
जिल्हा परिषद कृषी विभागाच्या अखत्यारितील जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या कृषी विभागाला बायोगॅस सयंत्र बांधकामांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यात सर्व तालुक्यात सरासरी २५ सयंत्र असे जिल्ह्यात १७० बायोगॅस बांधायचे होते. यातील सर्व तालुक्यात समाधानकारक उद्दिष्टपूर्ती झालेली आहे. माहे एप्रिल ते मार्च या वित्तीयवर्षांत हे बांधकाम करायचे आहे. पवनी वगळता उर्वरित तालुक्यात १८ ते २२ पर्यंत बायोगॅसचे बांधकाम करण्यात आलेले आहे. मात्र, पवनी तालुक्यात एका सयंत्राचे बांधकाम झालेले आहे. दरम्यान जिल्हा कृषी विकास अधिकारी एस. एस. किरवे यांनी प्रत्येक महिन्यात बायोगॅस बांधकामाचा वेळोवेळी आढावा घेतला. यात केवळ पवनी पंचायत समितीचे काम समाधानकारक आढळले नाही. याबाबत किरवे यांनी बी. आर. भोयर यांना दोनवेळा स्पष्टीकरण मागितले. मात्र, त्यांनी वरिष्ठांच्या पत्राची दखल घेतली नाही, किंवा बांधकामाची पूर्तता केली नाही. याबाबत कृषी विकास अधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केला. जगन्नाथ भोर यांनी आढावा बैठक घेतली. यात विस्तार अधिकारी (कृषी) भोयर यांचे काम असमाधानकारक वाटले. याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. (शहर प्रतिनिधी)
शासनाने दिलेले उद्दिष्टपूर्ती करणे सर्व कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आहे. यात कामचुकारपणा खपवून घेणार नाही. अहवाल व सकृतदर्शनीत भोयर हे जबाबदार ठरले. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. निलंबन काळात तुमसर पंचायत समिती त्यांचे मुख्यालय निश्चित केले आहे.
- जगन्नाथ भोर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. भंडारा.