दंड भरू, पण बाहेर फिरू ; विनाकारण फिरणारेच पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:34 AM2021-05-24T04:34:35+5:302021-05-24T04:34:35+5:30
इंद्रपाल कटकवार भंडारा : कोरोना महामारीला रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन अंतर्गत मोहीम राबवली जात आहे. विनाकारण कुणीही घराबाहेर पडू ...
इंद्रपाल कटकवार
भंडारा : कोरोना महामारीला रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन अंतर्गत मोहीम राबवली जात आहे. विनाकारण कुणीही घराबाहेर पडू नये म्हणून संचारबंदीही लागू करण्यात आली. मात्र अशा स्थितीतही शेकडो नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी भंडारा पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली. मात्र आम्ही ‘दंड भरू पण बाहेर फिरू’ अशी उदाहरणे समोर येत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेअंतर्गत आतापर्यंत स्थानिक प्रशासनाने ९८० जणांवर कारवाई करीत त्यांच्याकडून एक लक्ष ७८ हजार १५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. उल्लेखनीय म्हणजे बाहेर फिरणारे आतापर्यंत १६० व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्याची बाब समोर आली आहे. मात्र आम्ही तपासणीला जात आहोत, दवाखान्यातून आलो आहोत, अशी कारणे दाखवून वेळ मारून नेली जात आहे. नागरिक ऐकत नसल्याने प्रशासनाने रॅपिड टेस्ट सुरू केली आहे. या कारवाईला झुगारून नागरिक घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे.
शहरातील २७ ठिकाणी निगराणी ठेवण्यात आली असून आतापर्यंत १०१ ठिकाणी भेट देण्यात आली आहे. विशेष म्हणजे शहरातील २० उपहारगृह, तीन जिम तसेच ४५ सार्वजनिक स्थळी कारवाई करीत एकूण ९८० व्यक्तींविरुद्ध दंडात्मक कारवाई केली.
बॉक्स
शहरात २७ ठिकाणी तपासणी
विनाकारण घराबाहेर फिरताना आढळल्यामुळे प्रशासनाने तपासणीची संख्या वाढविली होती. शहरातील २७ ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या भरारी पथकाने व्यक्तींची कोरोना तपासणी केली आहे. जिल्ह्यातील अन्य तालुका मुख्यालयी अशीच स्थिती पहावयास मिळत आहे. मात्र नागरिकच नियमांना तिलांजली देत असल्याचे दिसून येत आहे. गत दहा दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात असताना नागरिकांचा हलगर्जीपणा अंगलट येऊ शकतो. सध्यातरी ‘नागरिकहो असे का वागता’ असे म्हणण्याची पुन्हा वेळ आली आहे.
तपासणीत कारणे मात्र तीच
शहरातील मुख्य चौकांमध्ये महसूल तथा पोलीस विभागाची पथके तैनात आहेत एखाद्या नागरिकाला अडविल्यास दवाखान्यात किंवा बँकेत किंवा अन्य महत्त्वाच्या कामाला जात असल्याचे सांगण्यात येते मात्र शहानिशा केल्यावर ती व्यक्ती शुल्लक कारणासाठी घराबाहेर पडल्याचे दिसून येत आहे.
याबाबत नागरिकांनीच पुढाकार घेण्याची खरी गरज निर्माण झाली आहे, यात शंका नाही.