प्रौढ शिक्षण प्रेरकांना थकीत मानधन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:36 AM2021-09-11T04:36:21+5:302021-09-11T04:36:21+5:30
१०लोक ०९ के साकोली : महाराष्ट्र राज्य साक्षर भारत अभियान अंतर्गत कामावर असलेले प्रेरक-प्रेरिका (प्रौढ शिक्षक) यांचा २२ महिन्यांपासून ...
१०लोक ०९ के
साकोली : महाराष्ट्र राज्य साक्षर भारत अभियान अंतर्गत कामावर असलेले प्रेरक-प्रेरिका (प्रौढ शिक्षक) यांचा २२ महिन्यांपासून थकीत असलेले मानधन त्वरित देऊन त्यांना शासकीय सेवेत कायम करावे, अशा मागणीचे निवेदन संघटनेच्या माध्यमातून राज्य शासनाला नुकतेच देण्यात आले. यावर निर्णय न लागल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
महाराष्ट्रात साक्षर भारत योजना अंतर्गत गोंदिया, गडचिरोली, नंदूरबार, बीड,जालना, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यातील ९३ तालुक्यातील ७,३१८ ग्रामपंचायत अंतर्गत १४ हजार ६३० प्रेरक-प्रेरिका कार्यरत आहेत. या प्रौढ शिक्षकांची नियुक्ती मानधन तत्त्वावर जानेवारी २०१२मध्ये करण्यात आली. या प्रौढ शिक्षकांनी नियुक्तीनंतर गावागावांत निरक्षरांना शिकविण्यासोबतच शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. साक्षर भारत अभियान जानेवारी २०१२ ते ३१ मार्च २०१८पर्यंतच ठेवण्यात आले. अभियान २०१८ पासून शासनाने बंद केल्याने आज या प्रेरक-प्रेरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. एवढेच नाही तर त्यांचे २२ महिन्यांचे मानधन सुद्धा अद्याप देण्यात आले नाही.
गोंदिया जिल्ह्यात १४२८ प्रेरक कार्यरत असून, अर्जुनी मोरगाव तालुक्यात १४४ प्रेरक कार्यरत आहेत. या प्रेरक-प्रेरिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच एक सभा घेऊन शासन व प्रशासनाला लेखी निवेदन सादर केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, प्रेरक-प्रेरिकांना ‘पढना-लिखना’ अभियानात समाविष्ट करण्यात यावे, २२ महिन्यांचे थकीत मानधन त्वरित देण्यात यावे, केंद्र व राज्य सरकारच्या शासकीय सेवेत समाविष्ट करावे, दरमहा मानधन द्यावे, प्रेरकाना अंशकालीन करण्यात यावे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समान काम, समान वेतन लागू करावे आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत. यावर विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मागण्यांचे निवेदन देतेवेळी प्रेरक संघटनेचे अध्यक्ष सुजाता वंजारी, उपाध्यक्ष प्रतीक राऊत, सचिव हेमराज जांभुळकर, कार्यवाह मनोज रामटेके, सदस्य कविता कामळे, नांदेश्वर, राऊत, राणी, राजेश राखडे, लांजे, चिमनकर उपस्थित होते.