रब्बी धानाचे चुकारे तत्काळ अदा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:40 AM2021-08-12T04:40:13+5:302021-08-12T04:40:13+5:30
यंदाच्या रब्बी हंगामात तालुक्यातील उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांनी धानाची विक्री तालुक्यातील विविध शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर केली. धानाची ...
यंदाच्या रब्बी हंगामात तालुक्यातील उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांनी धानाची विक्री तालुक्यातील विविध शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर केली. धानाची विक्री करून तब्बल अडीच महिने लोटले असताना धान उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप धानाचे चुकारे अदा करण्यात आले नसल्याचे वास्तव आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असून तालुक्यात सर्वत्रच धान लागवडीला वेग आला आहे. संबंधित शेतीकाम करताना ट्रॅक्टर व मजुरांकरवी भाड्याने केले जाते. सबंधितांना मजुरी देण्याकरिता उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने त्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
उन्हाळी धान विक्री करीत असताना शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर बारदाणा उपलब्ध नसल्याने शासन निर्देशानुसार शेतकऱ्यांकडून ज्युटच्या बारदाण्यात धान खरेदी करण्यात आले. शेतकऱ्यांकडे ज्युटचा बारदाणा नसल्याने संबंधित शेतकऱ्यांनी उधार उसने पैसे घेऊन ज्युटचा बारदाणा विकत घेऊन धानाची विक्री केली. मात्र, तब्बल अडीच महिने लोटून देखील धानाचे चुकारे न मिळाल्याने बारदाण्याचे पैसे कुठून द्यावे हा देखील मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.
यासह गतवर्षीच्या खरिपातील धानाला शासनाने ७०० रुपये प्रति क्विंटल बोनस जाहीर केले. मात्र, त्यापैकी केवळ अर्धे बोनस दिले आहेत व उर्वरित अर्धे बोनस शिल्लक आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन निधी शासनाने देण्याचे आश्वासित केले होते. सध्या घडीला तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून त्यांना तत्काळ रब्बी धानाचे चुकारे तत्काळ अदा करा व सोबतच अन्य मागण्या पूर्ण करा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. हे निवेदन लाखांदूरचे तहसीलदार अखिल भारत मेश्राम यांच्यामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देतेवेळी जि. प.चे माजी सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, गोपाल झोडे, पतीराम झोडे, नीकेश लंजे, हरिदास घाटे, सुकरण लंजे, धनराजहटवार, आदेश शेंडे, गिरीधर नागेश्वर, अरविंद राऊत, ताराचंद मातेरे, जगदीश बगमारे, पंडित गायकवाड, रामदास सावरकर यांसह अन्य धान उत्पादक शेतकरी उपस्थित होते.