भरणा ५.८९ कोटींचा, भरपाई शून्य
By Admin | Published: May 15, 2017 12:25 AM2017-05-15T00:25:19+5:302017-05-15T00:25:19+5:30
खरीप हंगाम २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील ७४ हजार ७८५ शेतकऱ्यांनी ७५ हजार ५३१ हेक्टर क्षेत्रातील धान पिकासाठी ....
प्रधानमंत्री पीक विमा योजना : बळीराजाच्या आशा-आकांक्षांवर पाणी
देवानंद नंदेश्वर । लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : खरीप हंगाम २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील ७४ हजार ७८५ शेतकऱ्यांनी ७५ हजार ५३१ हेक्टर क्षेत्रातील धान पिकासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनातंर्गत ५ कोटी ८९ लाख ५० हजार रुपये विमा हफत्याचा भरणा केला. निसर्गाच्या प्रकोपामुळे धानपीकाचे मोठे नुकसान झाले. हंगाम लोटून सहा सात महिने लोटले तरी पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना विम्याची अद्याप एक दमडीही मिळालेली नाही.
प्रधानमंत्री पीक विमा योजना ही खरीप हंगाम सन २०१६-१७ करिता लागू करण्यात आली. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येते. शेतकऱ्यांना नाविण्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान तसेच सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, पिकांच्या नुकसानीचे अत्यंत कठिण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे व कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना पीक कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील, अधिसूचित पिकांसाठी बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदाराच्या व्यतिरिक्त कुळाने अथवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेस पात्र आहेत. या योजनेंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येते. या योजनेंतर्गत जोखीमस्तर सर्व पिकांसाठी ७० टक्के असा निश्चित करण्यात आला. जोखमीच्या बाबींची व्याप्ती या योजनेंतर्गत वाढविण्यात आली. यामध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचा उंबरठा उत्पन्न हे मागील ७ वर्षांचे सरासरी उत्पन्न गुणीला त्या पिकांचा जोखीमस्तर विचारात घेऊन निश्चित केली जाते. हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामुळे हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, काढणी पश्चात नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतचा कालावधी, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे पिकातील उत्पन्नात येणारी घट व स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, अशी या योजनेची प्रमुख वैशिष्टै आहेत.
जिल्ह्यातील ७४ हजार ७८५ शेतकऱ्यांनी ७५ हजार ५३१ हेक्टर क्षेत्रातील धान पिकासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनातंर्गत विमा हप्त्यापोटी ५ कोटी ८९ लाख ५० हजार रुपय भरले. शासनाची जोरदार जाहिरातबाजी आणि दुष्काळाच्या भीतीने शेतकऱ्यांनी मोठ्या अडचणीत पीक विमा काढला. खरीप हंगामात जे घडायचे होत ते घडले. पावसाने दगा दिल्याने धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले. ज्यावेळी पावसाची पिकांना गरज होती त्यावेळी न बरसल्याने धान पीक जमीनदोस्त झाली.
प्रशासनाने जिल्ह्यात तुमसर तालुक्यातील चुल्हरडोह, आग्री, चिचोली व भोंडकी आणि साकोली तालुक्यातील नवेगाव (रिठी) या गावांचा दुष्काळ सदृष्य गावांमध्ये समावेश केला. विमा न काढणारे शेतकरी हवाल दिल झाले. विमा काढला असता तर काही लाभ मिळाला असता अशा विचारात असणारे शेतकरी आता मात्र विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांचे दुर्दैव पाहात आहेत. जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता त्यापैकी एकही शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून अद्याप एक नवा पैसाही कंपनीकडून मिळालेला नाही.
२०१५-१६ मध्ये ४५४ शेतकऱ्यांना भरपाई
जिल्ह्यात खरीप हंगाम २०१५-१६ मध्ये तृणधान्य भात हे पीक राष्ट्रीय कृषी विमा योजनेत समाविष्ट करण्यात आले होते. एकुण १५ हजार ६२८ हेक्टर क्षेत्रातील पिकासाठी ७५ लाख ७६ हजार रुपयांचा विमा हप्ता भरला होता. ११ हजार ६६५ शेतकऱ्यांनी त्यात सहभाग घेतला होता. विमा संरक्षीत रक्कम २५ कोटी २ लाख ७० हजार एवढी होती. त्या सत्रातदेखील शेतकऱ्यांना निसर्गाच्या प्रकोपाचा सामना करावा लागला होता. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ७५ लाख ७६ हजार रुपयांचा पीक विमा हप्ता काढूनही केवळ ४५४ शेतकऱ्यांना ४ लाख २८ हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळाली होती.