किसान रेलने भंडाराची मिरची पोहचली कोलकात्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 05:00 AM2020-12-04T05:00:00+5:302020-12-04T05:00:26+5:30
भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. परंतु अलिकडे शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाला पसंती दिली आहे. मोठ्या प्रमाणात गुणवत्तापुर्ण भाजीपाला उत्पादन केले जात आहे. भंडारा येथील बीटीबी सब्जी मंडी असोसिएशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीपासून ते विक्रीपर्यंत आणि आता निर्यात करण्यापर्यंत मार्गदर्शन केले जात आहे. यापूर्वी भंडारा येथील भेंडी आणि इतर भाजीपाला आखाती देशात निर्यात झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : रेल्वे मंत्रालयाने सुरु केलेल्या किसान रेलच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील मिरची आता थेट कोलकात्यात पोहचली. येथील बीटीबी सब्जीमंडीच्या पुढाकाराने बुधवारी २६०० किलो मिरची या रेल्वेने वरठी येथून रवाना झाली.
भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. परंतु अलिकडे शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाला पसंती दिली आहे. मोठ्या प्रमाणात गुणवत्तापुर्ण भाजीपाला उत्पादन केले जात आहे. भंडारा येथील बीटीबी सब्जी मंडी असोसिएशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीपासून ते विक्रीपर्यंत आणि आता निर्यात करण्यापर्यंत मार्गदर्शन केले जात आहे. यापूर्वी भंडारा येथील भेंडी आणि इतर भाजीपाला आखाती देशात निर्यात झाला होता. आता देशाच्या कानाकोपऱ्यात येथील भाजीपाला पोहचविला जात आहे. परंतु भंडारा शहरातून भाजीपाला पाठविण्यासाठी मोठी अडचण होती ती वाहतुकीची. रस्ता मार्गे भाजीपाला लांब अंतरावर पाठविला तर वाहतुकीचा खर्च मोठा येत होता आणि त्यातून शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित पैसा येत नव्हता. आता रेल्वे मंत्रालयाने सुरु केलेल्या किसान रेल्वेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विकासाचे मोठे दालन निर्माण करुन दिले आहे.
बुधवारी भंडारा रोड अर्थात वरठी रेल्वे स्थानकावरुन गेलेल्या किसान रेलमध्ये २६०० किलो मिरची कोलकात्याकडे रवाना करण्यात आली आहे. भंडारा रेल्वे स्थानकावर बीटीबीचे अध्यक्ष बंडु बारापात्रे यांनी हिरवी झेंडी दाखवत निर्यातीचे नवे पर्व जिल्ह्यात सुरु केले. विकासाची वाट शोधत असणाऱ्या शेतकऱ्यांना रेल्वेने नवा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.
भारतीय रेल्वेने शेतकरी हिताचा निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांना स्वतंत्र प्लॅटफाॅर्म उपलब्ध करुन द्यावा. वातानुकुलीत डब्यांची व्यवस्था करण्यात यावी. वेळेचे नियोजन स्वतंत्र आणि हमाल व्यवस्थाही स्वतंत्र असावी. विश्वासपात्र वातावरणाची निर्मिती करावी.
- बंडू बारापात्रे, अध्यक्ष, बीटीबी
किसान रेल्वे ही सेवा भंडारा जिल्ह्यात पहिल्यांदाच शेतकरी हितार्थ राबविण्यात येत आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. अत्यावश्यक सेवा प्रवास भाड्याच्या निम्मे दरात उपलब्ध करुन दिली आहे. शेतकऱ्यांना सेवा देण्याचा प्रयत्न करु.
- नितीन पाटील,
वाणिज्य निरीक्षक, वरठी रेल्वे स्टेशन