बालरोगतज्ज्ञ पराग डहाके यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 11:31 PM2017-10-14T23:31:03+5:302017-10-14T23:31:29+5:30
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित प्रख्यात बालरोगतज्ज्ञ डॉ.पराग झिंगरजी डहाके यांचे दीर्घ आजाराने शनिवारला दुपारी १२.४५ वाजता नागपूर येथे निधन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित प्रख्यात बालरोगतज्ज्ञ डॉ.पराग झिंगरजी डहाके यांचे दीर्घ आजाराने शनिवारला दुपारी १२.४५ वाजता नागपूर येथे निधन झाले. ३६ वर्षीय डॉ.पराग हे अविवाहीत होते. सामान्य लोकांना सेवा मिळावी, यासाठी ते जिल्हा सामान्य रूग्णालयात कार्यरत राहिले.
जगात कुपोषणाची भयावहता लक्षात घेता आॅक्सफोर्ड विद्यापीठ लंडन, जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकन अॅकेडमी आॅफ पिडीयाट्रिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने मे २०१६ मध्ये आॅक्सफोर्ड विद्यापीठात ‘कुपोषण’ या विषयावर बालरोग तज्ज्ञांचे जागतिक संमेलन पार पडले. या संमेलनात त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन करून त्यांचा गौरव केला होता.
बालकांच्या आरोग्यविषयक समस्यांचा अभ्यास यावर ‘एक्सीलेंस इन अॅकेडॅमिक्स अॅण्ड मेडिको सोशियल रिसर्च’साठी २०१५ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते डॉ.पराग यांना पदक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्राने गौरविण्यात आले होते. त्यांच्यामागे आईवडिल, मोठा भाऊ, वहिणी असा आप्तपरिवार आहे. मितभाषी स्वभावाच्या परागच्या निधनाने जिल्ह्यातील वैद्यकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. सायंकाळी वैनगंगा नदीघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रवीशेखर धकाते, आमदार चरण वाघमारे यांच्या उपस्थितीत आयोजित श्रद्धांजली सभेत जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांसह नागरिक उपस्थित होते.