पहिल्या दिवशी ३६५ वाहनधारकांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 10:08 PM2018-12-01T22:08:13+5:302018-12-01T22:09:21+5:30
हेल्मेट सक्तीच्या पहिल्याच दिवशी पोलीस आणि आरटीओने कठोर कारवाई करत हेल्मेटविना दुचाकी चालविणाऱ्या ३६५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १ लाख ५५ हजार दंड वसुल करण्यात आला. प्रशासनाने हेल्मेटसक्ती करताच अनेक नागरिक हेल्मेट घालून दुचाकी चालविताना शहरासह जिल्ह्यात दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : हेल्मेट सक्तीच्या पहिल्याच दिवशी पोलीस आणि आरटीओने कठोर कारवाई करत हेल्मेटविना दुचाकी चालविणाऱ्या ३६५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १ लाख ५५ हजार दंड वसुल करण्यात आला. प्रशासनाने हेल्मेटसक्ती करताच अनेक नागरिक हेल्मेट घालून दुचाकी चालविताना शहरासह जिल्ह्यात दिसून आले.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यासाठी भंडारा जिल्ह्यात १ डिसेंबर पासून हेल्मेट सक्ती करण्यात आली. त्याअंतर्गत शनिवारी सकाळपासूनच पोलिसांनी विविध ठिकाणी मोहीम राबविली. त्याअंतर्गत ३६५ व्यक्ती हेल्मेटविना दुचाकी चालवत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपये वसुल करण्यात आला. तर आरटीओ विभागाने देखील ३६ वाहनधारकांना मेमो दिले आहे.
पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून हेल्मेट न वापरणाºया दुचाकीचालकांना दंड ठोठावला. भंडारा शहरातही ही कारवाई करण्यात आली. शासकीय कार्यालयात नो हेल्मेट नो एन्ट्रीचा परिणाम शनिवारी दिसून आला. बहुतांश कर्मचारी हेल्मेट घालून कार्यालयात आल्याचे चित्र दिसत होते. हेल्मेट सक्तीमुळे अनेकांची धांदल उडाली असून नागरिक रस्त्यावर हेल्मेट विक्रीच्या दुकानात गर्दी करून असल्याचे शनिवारी दिसून आले. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण गाडे यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबविण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून कौतूक
हेल्मेट सक्तीच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी प्रशासनाला उत्तम प्रतिसाद दिला. त्याबद्दल जिल्हाधिकारी शांतनू गोयल आणि पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी हेल्मेटचा वापर करणाºया दुचाकी स्वारांचे पुष्पगुच्छ देऊन कौतूक केले. मोटर वाहन अपघाताचे प्रमाण टाळण्यासाठी आणि स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.