निराधारांना ४ महिन्यांपासून सरकारचा आधारच नाही; लाभार्त्यांच्या नशिबी वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 12:29 PM2021-10-12T12:29:06+5:302021-10-12T13:09:55+5:30
मोहाडी तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेतील निराधारांना गेले चार महिन्यांपासून आर्थिक मदत मिळालेली नाही. आपल्या बँक खात्यात सदर रक्कम जमा झाली आहे का हे पाहण्यासाठी वृद्ध नागरीक बँकेत हेलपाटे मारत आहेत.
राजू बांते
भंडारा : निराधार व्यक्तींना शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा मोठा आधार आहे. परंतु, जून महिन्यापासून निराधारांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कमच आलेली नाही. गेल्या चार महिन्यांपासून वृद्ध बँकेचे उंबरठे झिजवत आहेत. आता तर, गाव नेत्यांना वृद्ध साकडे घालत , ''दादा कई येतील गा माया खात्यात पैसे'' असा हृदय हेलावून टाकणारा प्रश्न विचारीत आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांना एक तारखेला वेतन मिळाला नाहीतर ते किती आटापिटा करतात हे अनेकांनी बघितले आहे. मात्र निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, दिव्यांग, शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, घटस्फोटीत महिला, अनाथ मुले यांना संजय गांधी निराधार योजनेतून दरमहिन्याला हजार रुपयाचे अनुदान मिळण्यासाठी चार महिन्यांची प्रतीक्षा करावी लागते. संयम व सहनशीलतेच्या पलीकडची सीमा पार केली असतानाही बिचारे आपली फिर्याद मांडत नाही.
वीस दिवसांवर दिवाळीचा सण येऊन पडला आहे. त्यामुळे हरदोली येथील चंद्रकला भोयर, मनाबाई झंझाड वृद्ध महिला राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष व गावाचे सरपंच सदाशिव ढेंगे यांच्याकडे गेली. दादा, बोहूत दिवस झाले न गा माया बँक खात्यात पैसे नाही आले न, मले आता औसद कोण देयेल गा उदारी, पाय न गा काही दिवसांवर दिवाळीबी येऊन रायली, कर न काही दादा असा मन हेलावून टाकणाऱ्या प्रश्नाने गाव नेते सदाशिव ढेंगे यांचे डोळे डबडबले.
२९ हजार निराधारांची फरफट
केंद्र शासनाने इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, विधवा, अपंग यांच्या अनुदानसाठी जून ते ऑगस्टपर्यंतचा २००-३०० रुपये हिस्सा तहसीलदार यांच्याकडे पाठविला आहे. परंतु राज्य शासनाने आपला हिस्सा पाठविला नसल्याने ३० हजार निराधारांची फरफट होत आहे. दिवाळीच्या तोंडावर तरी जून-ऑक्टोबरपर्यंतचा अनुदान देण्यात यावा, अशी मागणी वृद्धांनी केली आहे.