खिळेमुक्त वृक्ष अभियानाला हवी जनतेची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 09:53 PM2018-12-15T21:53:28+5:302018-12-15T21:54:13+5:30

संवेदनशिल मनाला जसे शब्द बोचतात तसेच प्रत्येक वृक्षालाही खिळे. जाहिरातबाजीच्या नादात राज्य मार्गासह ठिकठिकाणच्या वृक्षांवर खिळे ठोकले जातात. या खिळ्यांमुळे वृक्षांचे विद्रुपीकरण होते. तसेच वृक्षवाढीसाठी खिळे बाधाही पोहचवितात. हा प्रकार टाळण्यासाठी भंडारा शहरातील संवेदनशिल मनानी खिळेमुक्त वृक्ष अभियान हाती घेतले आहे.

The people with the need for Nile-free tree campaign | खिळेमुक्त वृक्ष अभियानाला हवी जनतेची साथ

खिळेमुक्त वृक्ष अभियानाला हवी जनतेची साथ

Next
ठळक मुद्देवृक्ष संवर्धन : बॅनर, पोस्टर लावताना ठोकले जातात खिळे

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : संवेदनशिल मनाला जसे शब्द बोचतात तसेच प्रत्येक वृक्षालाही खिळे. जाहिरातबाजीच्या नादात राज्य मार्गासह ठिकठिकाणच्या वृक्षांवर खिळे ठोकले जातात. या खिळ्यांमुळे वृक्षांचे विद्रुपीकरण होते. तसेच वृक्षवाढीसाठी खिळे बाधाही पोहचवितात. हा प्रकार टाळण्यासाठी भंडारा शहरातील संवेदनशिल मनानी खिळेमुक्त वृक्ष अभियान हाती घेतले आहे. शेकडो वृक्षांवर ठोकलेले खिळे काढण्याचा उपक्रम सुरु आहे. मात्र हा उपक्रम लोकचळवळ व्हावी यासाठी जनतेचे सहकार्य हवे आहे.
बॅनर, पोस्टर्स लावताना हमखास खिळ्यांचा उपयोग केला जातो. राज्य मार्गासह विविध ठिकाणच्या वृक्षांवर फ्लेक्स, बॅनर लावताना मोठ्या प्रमाणात खिळे वापरले जातात. वृक्षांनाही संवेदना असते. त्यांच्यातही प्राण असतो. हे विज्ञानाने सिद्ध केले. त्यानंतरही मनुष्य प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आपले पोस्टर, बॅनर्स ठिकठिकाणी खिळ्याने ठोकतो. हा प्रकार टाळण्यासाठी भंडारा येथील खुशी बहुउद्देशिय संस्था, युवा जनकल्याण आणि पुणे येथील आंघोळीची गोळी या संस्थेने वृक्ष संवर्धन उपक्रम हाती घेतला आहे. भंडारा शहरात सात महिन्यांपूर्वी राजेश राऊत यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम सुरु झाली. एक हातोडी घेऊन ते आपल्या सहकाऱ्यांसह शहरातील झाडांवर ठोकलेले खिळे काढतात. आता त्यांच्या या मोहीमेत अनेक जण सहभागी झाले. शहरातीलच नव्हे तर राज्य मार्गावरील आणि राष्ट्रीय महामार्गावरील अनेक झाडे खिळेमुक्त आणि वेदनामुक्त झाली आहेत. पहायला गेले तर झाडाचे खिळे काढणे खुप छोटे काम. परंतु यासाठीही कुणी पुढाकार घेत नाही. शहरातील नागरिकांनी आपला केवळ अर्धा तास दिला तरी शेकडो झाडे खिळेमुक्त होऊन बहरतील. यासाठी भंडारा शहरातील नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे.
सध्या भंडारा शहरात राजेश राऊत, जाधवराव साठवणे, नेमाजी करकाडे, हेमंत धुमनखेडे, आशिष भुरे, झेड.आय. डहाके, पंकज डहाके, मंगला डहाके, पूनम डहाके, स्वाती सेलोकर, मुक्ता बोंदरे, कुमार वरद डहाके, जय सेलोकर आदी खिळेमुक्त वृक्ष मोहीमेत सहभागी झाले आहेत. पाणी आणि वृक्ष बचतीचा हा संदेश ते नागरिकांना देत आहेत. आता भंडारातील वृक्षप्रेमी नागरिकांनी खिळेमुक्त वृक्ष मोहीमेसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्याला नगरपरिषदेनेही साथ दिल्यास ही मोहीम चांगली जोर धरेल.
वृक्षाला खिळे ठोकणाऱ्यांवर कारवाई हवी
जाहिरातीच्या नादात जाहिरातदार झाडावर खिळे ठोकून जाहिरातदार पोस्टर्स, बॅनर्स, भित्तीपत्रके लावतात. त्यामुळे झाडांना इजा होते. शहराचे सौंदर्य बाधित होते. अशा व्यक्तींवर नगरपरिषदेने कारवाई करण्याची गरज आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने झाडांना खिळे ठोकणे व विद्रुपीकरण रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. संबंधितांना अवधी देऊन खिळे काढण्याचे आवाहन केले. याला न जुमानणाऱ्याविरुद्ध महाराष्ट्र विरुपण प्रतिबंध अधिनियम १९९५ अन्वये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. असाच इशारा भंडारा नगरपरिषदेनेही द्यावा अशी मागणी वृक्ष प्रेमी करीत आहेत.

Web Title: The people with the need for Nile-free tree campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.