वैनगंगा बचावासाठी जनआंदोलन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 10:56 PM2018-02-23T22:56:40+5:302018-02-23T22:56:40+5:30
नागपूरच्या नाग नदीचे दूषित पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येत असल्यामुळे वैनगंगेचे नदीचे पात्र प्रदूषित झाले आहे.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : नागपूरच्या नाग नदीचे दूषित पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येत असल्यामुळे वैनगंगेचे नदीचे पात्र प्रदूषित झाले आहे. आता वैनगंगेला दूषित होण्यापासून वाचविण्याकरिता वैनगंगा बचाव जनआंदोलन करणार असल्याचा ईशारा काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना पटोले यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिला.
भंडारा जिल्हावासियांसाठी वैनगंगा नदी ही जीवनदायीनी आहे. मात्र मागील काही वर्षांपासून वैनगंगा नदी प्रदूषित नद्यांच्या यादीत गणल्या जात आहे. गोसेखुर्द धरणात नाग नदीचे दूषित पाणी सोडण्यात येत आहे. याचा परिणाम जनतेच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे नाग नदीचे पाणी वैनगंगेत सोडणे थांबविण्यात यावे, अशी आमची मागणी आहे.
यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. १९ नोव्हेंबर २०१५ ला एका आदेशाद्वारे वैनगंगा नदीमध्ये दूषित पाणी आधी शुध्द करण्यात यावे व त्यानंतर वैनगंगेत सोडण्यात यावे, असा आदेश दिला आहे. मात्र या आदेशाचे पालन करण्यात आले नाही. हा न्यायालयाचा अवमान असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला. नागपूर महानगर पालिकेने नाग नदीचे दूषित पाणी शुध्द करण्याकरीता प्रकल्प सुरू करण्याची तयारी दर्शविली होती.
केंद्र सरकारकडून एनआरसीपी अंतर्गत मंजुरी मिळाल्यानंतर कामाला सुरूवात होणार होती. मात्र प्रकल्पाला मंजुरी कधी मिळेल? व मंजुरी मिळाल्यास प्रकल्प उभारण्यासाठी नेमका किती कालावधी लागेल? या प्रश्नांची उत्तरे शासनाने दिलेली नाही. वैनगंगेच्या शुद्धीकरणासाठी आणखी चार वर्षे लागतील असे पालकमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आणखी चार वर्षे हा प्रश्न सुटणार नाही का? असा सवाल करून आता जन आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचा ईशाराही पटोले यांनी दिला. पत्रपरिषदेत माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, राजकपुर राऊत, उपस्थित होते.