लोक अदालतीत समजुतीने पुन्हा बहरली संसारवेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2021 05:00 AM2021-12-12T05:00:00+5:302021-12-12T05:00:33+5:30
शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय यांच्यावतीने कौटुंबिक वाद प्रकरणे निकाली काढण्यात आली. कौटुंबिक न्यायालय येथे प्रलंबित असलेल्या प्रकरणात पॅनल अधिकाऱ्यासह दिवाणी न्यायाधीश पी. पी. देशमुख व कौटुंबिक न्यायालय विवाह समुपदेशक आर. पी. कटरे यांनी निर्णायक भूमिका बजावत संसार फुलविण्याची व मनोमिलनाची पक्षकाराला संधी दिली. कोणतेही नाते टिकवायचे असल्यास दोघांनी परस्परांना समजून घेणे महत्त्वाचे असते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : संसार म्हणजे दोन अनोळखी माणसांनी आयुष्यभर सोबत करावयाचा प्रवास. या प्रवासात कधी सुख येते तर कधी दुःखे येत असतात. तरीदेखील एकमेकांना सोबत करायची...! कधी कधी या संसारात छोट्या गोष्टीवरून खटके उडतात. दुरावा निर्माण होतो. मात्र, आजच्या लोक अदालत आयोजनाची यशस्वी फलश्रुती भंडारा येथे पहावयास मिळाली. दुरावा आलेल्या जोडप्याने समजुतीने पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.
शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय यांच्यावतीने कौटुंबिक वाद प्रकरणे निकाली काढण्यात आली. कौटुंबिक न्यायालय येथे प्रलंबित असलेल्या प्रकरणात पॅनल अधिकाऱ्यासह दिवाणी न्यायाधीश पी. पी. देशमुख व कौटुंबिक न्यायालय विवाह समुपदेशक आर. पी. कटरे यांनी निर्णायक भूमिका बजावत संसार फुलविण्याची व मनोमिलनाची पक्षकाराला संधी दिली. कोणतेही नाते टिकवायचे असल्यास दोघांनी परस्परांना समजून घेणे महत्त्वाचे असते. संसारात दोघांची भूमिका अहम असून दोघांनी टोकाची भूमिका न घेता सामंजस्यांने स्वतःच्या पुढाकाराने एकत्रित येण्याचा निर्णय घेतला. हे विशेषतः उल्लेखनीय असल्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी संदेश देत एकत्रित राहण्यास तयार झालेल्या जोडप्यांना त्यांच्या भावी वाटचालीकरिता रोपटे देऊन शुभेच्छा दिल्या. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय भंडारा व अधिनस्थ तालुका न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत एकाच दिवशी १ हजार ९४१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात ३४७ प्रलंबित तर १ हजार ५९४ न्यायपूर्वप्रविष्ठ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंजू शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व फौजदारी व दिवाणी न्यायालय, कामगार न्यायालय, औद्योगिक न्यायालय, कौटुंबिक न्यायालयामध्ये ही लोकअदालत आयोजित करण्यात आली. याकरिता पॅनल सदस्य म्हणून न्यायाधीश व अधिवक्तागण यांनी काम पाहिले. लोकअदालतमध्ये कोरोना नियमांचे पालन करण्यात आले. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील सर्व न्यायीक अधिकारी, पॅनल सदस्य, अधिवक्तागण, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी प्रशासकीय अधिकारी यांनी सहकार्य केले. लोकअदालतीच्या आयोजनासाठी केलेल्या सहकार्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुहास प्र. भोसले यांनी सर्व न्यायीक अधिकारी, पॅनल सदस्य, अधिवक्ता, कर्मचारी पोलीस प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी व पक्षकारांचे आभार मानले.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
- लोकअदालतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन दोन प्रकरणात पक्षकार प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकल्यामुळे पॅनल अधिकाऱ्यांसह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पी. पी. देशमुख यांनी व्हॉट्स ॲप व्हिडीओ कॉलव्दारे संपर्क करून तडजोड घडवून आणली. तसेच सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पी. ए. पटेल यांनीदेखील दोन प्रकरणात व्हिडीओ कॉलव्दारे संपर्क करून तडजोड घडवून आणली.