विकास प्रक्रियेत लोकांचा सहभाग अतिमहत्त्वाचा
By admin | Published: July 1, 2017 12:26 AM2017-07-01T00:26:27+5:302017-07-01T00:26:27+5:30
केंद्र सरकार विविध कल्याणकारी योजना राबवित असून त्यातून लोकांचा विकास साध्य करणे हे महत्त्वाचा उद्देश आहे.
राजेश काशिवार : विशेष प्रचार अभियान
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : केंद्र सरकार विविध कल्याणकारी योजना राबवित असून त्यातून लोकांचा विकास साध्य करणे हे महत्त्वाचा उद्देश आहे. या विकास प्रक्रियेत प्रत्येक व्यक्तीचा महत्त्वाचा सहभाग असल्याचे मत आमदार राजेश काशिवार यांनी भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने लाखनी तालुक्यातील शिवणी (मोगरा) येथे आयोजित विशेष प्रचार अभियानात बोलतांना व्यक्त केले.
या विशेष प्रचार अभियानात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, शिवणीच्या सरपंच माया कुथे, पंचायत समिती सदस्य मोनाली गाढवे, गटविकास अधिकारी मिलींद बडगे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आर.एस.खांडेकर, जिल्हा साथरोग अधिकारी रवी कापगते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहूल शेंडे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस.आर. निर्वाण, बँक आॅफ महाराष्ट्र चे उपव्यवस्थापक रचित शुक्ला, नवचैतन्य विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.एम.राऊत तसेच क्षेत्रिय प्रचार अधिकारी मनोज सोनोने यावेळी उपस्थित होते.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रिय प्रचार कार्यालयाच्या वतीने आयोजित या विशेष प्रचार अभियानात बोलतांना आमदार काशिवार पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात लोकशाहीचे महत्व प्रकट करतांना प्रत्येक व्यक्तीच्या विकासावर भर देण्यात आला असून हा विकास साध्य करण्यासाठी प्रत्येकाने लोकशाही प्रक्रीयेत सहभागी होवून विकास साध्य करण्यासाठी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी मुद्रा तसेच बँकेच्या योजनांची माहिती देतांना अग्रणी जिल्हा बँकेचे व्यवस्थापक आर.एस.खांडेकर यांनी मुद्रा बँक तसेच अटल पेन्शन योजना व इतर विमा योजना बाबत उपस्थितांना माहिती दिली. लाखनीच्या बँक आॅफ महाराष्ट्रचे उपव्यवस्थापक रचित शुक्ला यांनी भीम अॅपबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कौशल्य विकास योजनेबाबत बोलतांना शासकीय औद्यागिक संस्थेचे प्राचार्य एस.आर.निर्वाण यांनी स्किल इंडिया बाबत माहिती देवून विद्यार्थ्यांनी आयटीआयच्या माध्यमातून कौशल्य साध्य करता येईल, असे सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांनी या प्रचार अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. जिल्हा साथरोग अधिकारी रवी कापगते यांनी आरोग्याच्या विविध योजनांबाबत माहिती दिली. तसेच बार्टी या संस्थेचे हृदय गोडबोले यांनी बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पाची माहिती दिली. प्रचार अभियानाच्या निमित्ताने शिवणी येथील नवचैतन्य विद्यालयातून जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक एम.एम.राऊत यांनी रॅलीस हिरवी झेंडी दाखविली. ही रॅली गावातून फि रुन कार्यक्रम स्थळी विसर्जित झाली. यावेळी क्षेत्रिय प्रचार अधिकारी मनोज सोनोने यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. बँक आॅफ इंडिया तसेच महाराष्ट्र बँकेने सुध्दा आपल्या योजनांची माहिती देणारी प्रदर्शनी लावण्यात आली होती. आयसीडीएस मार्फत सकस आहार प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
संचालन व आभार अंबादास यादव यांनी केले. कार्यक्रमासाठी रामचंद्र सोनसळ, ग्रामसेवक जयंत गडपाल, ग्रामपंचायत कर्मचारी व अंगणवाडी सेविकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला असर फाऊन्डेशन सांस्कृतिक कलापथकांनी शासकीय योजनांवर आधारीत गीत व नाटकाचे सादरीकरण केले.