आॅनलाईन सातबारा नोंदणीची टक्केवारी शतकपूर्तीकडे
By Admin | Published: July 14, 2017 12:57 AM2017-07-14T00:57:41+5:302017-07-14T00:57:41+5:30
आॅनलाईन सातबारा नोंदणीकृत करण्याच्या मोहिमेत भंडारा जिल्हा प्रशासन आघाडीवर असून त्याची टक्केवारी ९९.२९ टक्के इतकी आहे.
चावडी वाचनाचे उद्दिष्टही पूर्ण : पीक पाहणीत ५,८११ नोंदी
इंद्रपाल कटकवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आॅनलाईन सातबारा नोंदणीकृत करण्याच्या मोहिमेत भंडारा जिल्हा प्रशासन आघाडीवर असून त्याची टक्केवारी ९९.२९ टक्के इतकी आहे. विशेष म्हणजे आता शेतकरी व नागरिकांना कुठल्याही ठिकाणाहून आॅनलाईन सातबारा मिळू शकणार आहे. तश सोय करण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यातील ८७६ गावांमध्ये चावडी वाचन हा उपक्रम १५ मे ते ३० जून या कालावधीत राबविण्यात आला. यात शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. जिल्ह्यात १२ जुलै २०१७ पर्यंत ५ लक्ष ७५ हजार ६८४ पैकी ५ लक्ष ७१ हजार ५९१ सातबारा आॅनलाईन नोंदणी करण्यात आलेली आहे.
पीक पाहणीचा समावेश
आॅनलाईन सातबारा अंतर्गत पीक पाहणी दुरूस्त करून एकूण ५,८११ प्रकरणे दुरूस्त करण्यात आले आहेत. एकूण सातबारांच्या नोंदणीपैकी १८ हजार २७३ सातबारा बंद अवस्थेत असल्याची नोंद आहे. नाव, आडनावात बदल, खरेदी-विक्रीच्या नोंदी अशा अन्य त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यापैकी बरीच कामे झाली असून ३१ जुलै २०१७ पर्यंत उर्वरित सातबारा आॅनलाईन नोंदणीकृत करण्याचे कार्य सुरू आहे. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये साफ्टवेअरमध्ये त्रुटी असल्याची बाब समोर आली होती. मात्र भंडारा जिल्हा या बाबीला अपवाद ठरला आहे. यापूर्वी लिखित सातबारे देण्याचा कार्यक्रमाला स्थगिती देण्यात येऊन आॅनलाईन सातबारा देण्याकडे जिल्हा प्रशासनाने पाऊले उचलली आहे.
टप्याटप्याने आॅनलाईन सातबारा नोंदणीकृत करण्याचे कार्य अजूनही सुरू आहे. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ जुलैपर्यंत सदर उद्दिष्ट पूर्ण करण्याचे ध्येय असून आॅनलाईन सातबारा वाटप करण्याच्या हेतूने कार्य सुरू आहे.
-सुजाता गंधे,
उपजिल्हाधिकारी (महसूल) भंडारा.