मतदानाची टक्केवारी ४० च्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:45 PM2018-05-28T23:45:12+5:302018-05-28T23:53:10+5:30

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएमच्या बिघाडाचा परिणाम मतदानावर सकाळपासून दिसून आला. या मतदारसंघातील ६ विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ६ वाजतापर्यंत मतदानाची टक्केवारी ४० ते ४५ टक्के इतकीच झाली.

The percentage of voting is 40 in the house | मतदानाची टक्केवारी ४० च्या घरात

मतदानाची टक्केवारी ४० च्या घरात

ठळक मुद्दे१८ उमेदवारांचे भाग्य मशीन बंद : ईव्हीएमच्या तांत्रिक बिघाडामुळे घसरली मतदानाची टक्केवारी

भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएमच्या बिघाडाचा परिणाम मतदानावर सकाळपासून दिसून आला. या मतदारसंघातील ६ विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ६ वाजतापर्यंत मतदानाची टक्केवारी ४० ते ४५ टक्के इतकीच झाली. २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानात कमालिची झट झाली आहे. पुनर्वसनाच्या समस्या कायम असल्याचा आरोप करून प्रकल्पग्रस्त मतदारांनी मतदानावर बहिष्काराच्या घातला. या घटना वगळता सर्वच २,१४९ मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

या पोटनिवडणुकीत भाजपचे हेमंत पटले, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे मधुकर कुकडे, भारिपचे अ‍ॅड.एल.के. मडावी, बीआरएसपीचे राजेश बोरकर यांच्यासह १८ उमेदवार रिंगणात होते. सायंकाळी ६ वाजता या उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद झाले. या पोटनिवडणुकीत शहरी व ग्रामीण मतदारांमध्ये निरूत्साह होता. परंतु मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अनेकांनी तापमानाचा त्रास होऊ नये यासाठी सकाळच्या सुमारास मतदान केंद्र गाठले परंतु मतदारसंघातील सर्वच १५ ही तालुक्यातील बहुतांश ईव्हीएम मशिनमध्ये सकाळपासूनच तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे मतदानासाठी आलेल्या अनेकांना आल्यापावली परतावे लागले. ज्या मतदान केंद्रांतील ईव्हीएममध्ये अडचणी आल्या नाहीत, त्याठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत होती. सकाळी ९ पर्यंत ५.९८ टक्के, ११ पर्यंत १३.९० टक्के, १ पर्यंत २२.५९ टक्के, ३ पर्यंत २४.५७ टक्के मतदान झाले होते. ऊन्हामुळे सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत मतदारांची संख्या अत्यल्प होती. बहुतांश मतदान केंद्रात शुकशुकाट दिसून आला तर सायंकाळी अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले.
 

सामाजिक न्याय भवनात मतमोजणी ३१ मे रोजी
या पोटनिवडणुकीची मतमोजणी दि.३१ मे रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात होईल. सकाळी ८ पासून विधानसभानिहाय १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. त्यासाठी या भवनात चोख व्यवस्था करण्यात आली. या भवनाच्या आतील कुणाला काही दिसू नये, यासाठी सभोवताल टिनाचे पत्रे लावण्यात आले आहे. याशिवाय सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 

बहिष्कार घातलेल्या गावात अत्यल्प मतदान
गोसेखुर्द प्रकल्पामुळे बाधित बोरगाव, निमगाव यासह त्या परिसरातील अनेक गावांनी मतदानावर बहिष्कार घातला होता. दरम्यान, याची माहिती मिळताच माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे आणि माजी आमदार आनंदराव वंजारी यांनी या गावांना भेटी देऊन मतदारांशी चर्चा केली आणि त्यांना लोकशाहीत मतदान हा आपला अधिकार आहे, याची जाणीव करून दिली. त्यांच्या विनंतीला मान देत काहींनी मतदान करू असे सांगितले तर काहींनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून आले. बोरगाव येथे १,१५५ मतदानापैकी ८० ते ९० मतदान झाले. निमगाव येथे शंभरच्या आत मतदान झाल्याचे सांगण्यात आले.
 

लोकशाही धोक्यात -राकॉ, भारिपचा आरोप
२,१४९ मतदार केंद्रावर घेण्यात आलेल्या बहुतांश मतदान केंद्रातील ईव्हीएममध्ये सकाळपासून तांत्रिक बिघाड का? झाला असा प्रश्न उपस्थित करून शासन प्रशासनावर दबाव आणून निवडणुका जिंकत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारिप बहुजन महासंघाने केला. या मतदारसंघात ३५० ते ४०० ईव्हीएम बंद आढळून आल्या. काही मशिनमध्ये व्हीव्हीपॅटमधून चिठ्या निघत नसल्याचे सांगून बटन कोणतेही दाबा मत कमळाला जात असल्यामुळे या देशात लोकशाहीला धोका निर्माण झाला. निवडणूक आयोगही सरकारच्या दबावात आहे. त्यामुळे येणारा काळ जनतेने समजून घेतला पाहिजे. निवडणूक आयोगाने सरकारची कठपुतली म्हणून काम करू नये, असेही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल, भारिपचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, ज्ञानेश्वर सुलताने, अनुप बहुले, डी.आर.रामटेके, महेश मेश्राम उपस्थित होते.

Web Title: The percentage of voting is 40 in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.