लाखनी तालुक्यात बहुवार्षिक चारा लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 06:00 AM2019-09-15T06:00:00+5:302019-09-15T06:01:19+5:30
या मिशन नव्वदचा पहिला टप्पा म्हणून तालुक्यातील सर्व गावामध्ये बहुवार्षिक चारा पिक लागवड, प्रचार व प्रसार अभियान राबविण्यात आला. आज गायी, म्हशीची परिस्थिती पाहता चराईबंदी असल्यामुळे केवळ वाळलेल्या चाऱ्यावर व पशुखाद्यावर त्याचे पोषण होते. त्यामुळे गायी, म्हशी कुपोषीत दिसतात. तिन पेक्षा जास्त बरगड्या जर गायी म्हशीच्या दिसल्या तर त्यांना कुपोषीत आहेत, असे समजावे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : लाखनी तालुक्यातील नव्वद गावातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मिशन नव्वद हा उपक्रम पशुवैद्यकिय दवाखाना लाखनीतर्फे संपूर्ण तालुक्यात गत दोन महिन्यांपासून सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये पशुधनाच्या विकासासाठी विविध बाबींची पशुपालकांना वेळोवेळी प्रशिक्षण व माहिती देवून नामवंत पशुधनाच्या जाती विकसीत करुन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
या मिशन नव्वदचा पहिला टप्पा म्हणून तालुक्यातील सर्व गावामध्ये बहुवार्षिक चारा पिक लागवड, प्रचार व प्रसार अभियान राबविण्यात आला. आज गायी, म्हशीची परिस्थिती पाहता चराईबंदी असल्यामुळे केवळ वाळलेल्या चाऱ्यावर व पशुखाद्यावर त्याचे पोषण होते. त्यामुळे गायी, म्हशी कुपोषीत दिसतात. तिन पेक्षा जास्त बरगड्या जर गायी म्हशीच्या दिसल्या तर त्यांना कुपोषीत आहेत, असे समजावे. गायी, म्हशी जर कुपोषित असल्या तर त्या पूर्ण क्षमतेने दुध उत्पादन देत नाही. वेळेवर गर्भधारणा राहत नाहीत. त्यामुळे दुधव्यवसाय तोट्यात जातो व पशुपालकांची आर्थिक स्थिती नाजूक होते. जनावरे वारंवार आजारी पडतात व औषधोपचाराला खर्च होतो. यासाठी जनावराचे कुपोषण घालविणे गरजेचे आहे. केवळ पशुखाद्यावर जर शेतकरी अवलंबून राहिला तर पशुता अॅसीडीटीचा खुप त्रास होतो. स्तनदाहाचे प्रमाण वाढते. याकरिता दुध देणाºया पशुंना हिरवाचारा वर्षभर उपलब्ध करुन देणे हे प्रत्येक पशुपालकाचे हिताचे आहे.
शासनातर्फे दरवर्षी मका, ज्वारी, बरसीन आदी वाणाचे बियाणे वाटप करण्यात येते. परंतु ही चारा पिके काही हंगामासाठी असतात. परंतु बहुवार्षिक चारा पिकांची लागवड केली तर कित्येक वर्षे त्यापासून सतत हिरवा चारा उत्पादन घेता येते. वारंवार लागवड करण्याच्या खर्चापासून सुध्दा शेतकºयांची बचत होते. याकरिता उत्कृष्ट जातीच्या बहुवार्षिक चारा पिके लागवड प्रचार व प्रसार अभियान पशुधन विकास अधिकारी डॉ. गुणवत भडके यांच्या नेतृत्वात कोणत्याही प्रकारच्या शासकीय अनुदानाशिवाय राबविण्यात आला.
लाखनी तालुक्यातील नव्वद गावात नव्वद सभाचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक गावातील काही पशुपालक शेतकऱ्यांना बहुवार्षिक चारा बियाणे मोफत देण्यात आले. यासाठी चार बहुवार्षिक चारा पिके, लागवड करुन त्यापासून तयार झालेले बेणे वाटप करण्यात आले. काही बेणे सामाजिक संस्थाच्या मदतीने बाहेरुन मागविण्यात आले. तालुक्यात या उपक्रमांतर्गत सत्तावीस हजार बेने वाटप करण्यात आले.
या उपक्रमाला मुरमाडीच्या पशुधन विकास अधिकारी डॉ. भाग्यश्री राठोड, पालांदूरच्या डॉ. देवयानी नगराडे, लाखोरीचे योगेश कापगते, पिपंळगावचे सहायक पशुधन विकास अधिकारी सुकराम मारवाडे, राजेश मरस्कोल्हे यांनी सहकार्य केले.
या प्रशंसनीय कार्यासाठी हेमंत राखडे, आनंद कुडगये, संतोष कांबळे, प्रविण डोंगरे, संदीप देवुळकर, तिकवडू बुराडे, अर्जुन खंडाईत, नागपूरे, दानीश शेख, भाग्यवान लांजेवार, बालु पंचबुध्दे, खुशाल बागडे, योगेश झलके, सोमेश्वर वाघाडे यांनी सहकार्य केले.
मिशन ९० या उपक्रमाप्रमाणे यापुढेही असे विविध उपक्रम तालुक्यात राबवून शेतकºयांचे आर्थिक उत्पन्न वाढवून पशुधनाचा बाबतीत लाखनी तालुक्याला विदर्भात सर्वोत्कृष्ट तालुका तयार करण्याचा मानस डॉ. गुणवंत भडके यांचा आहे. त्यांच्या निर्णयाचे लाखनी तालुक्यात कौतुक होत आहे.
गोपालकांमध्ये जनजागृती
लाखनी तालुक्यातील नव्वद गावांमध्ये गत एका महिन्यात प्रत्येक गावात सार्वजनिक ठिकाणी गावातील काही पशुपालकांना एकत्र बोलवून पशुच्या आहारात हिरवा व वाळलेला चाऱ्याचे महत्व समजावून देण्यात आले. प्रत्येक गावातील उपस्थित पशुपालकांना बहुवार्षिक चारा पिकांचे बियाणे म्हणून ठोंबे मोफत देण्यात आले. त्याचे संपूर्ण महत्व, लावण्याची पध्दत, महिन्याला हिरव्या चाऱ्याचे उत्पादन याविषयी सविस्तर माहिती देवून हिरवा चाराची लागवड मोठ्या प्रमाणात करण्याचे आवाहन करण्यात आले.