धानपिकाच्या नुकसानीचे पंचनामे करा
By admin | Published: November 23, 2015 12:42 AM2015-11-23T00:42:57+5:302015-11-23T00:42:57+5:30
मोहाडी तालुक्यातील डोंगरगावसह सर्व गाव परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील धानपिकाच्या नुकसानीचे महसूल ....
भंडारा : मोहाडी तालुक्यातील डोंगरगावसह सर्व गाव परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील धानपिकाच्या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने संयुक्तरीत्या पंचनामे करुन तात्काळ महसुल व कृषी विभागाने संयुक्तरीत्या पंचनामे करुन तत्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी एकता महिला शेतकरी मंचच्या अध्यक्षा संध्या गभणे यांनी केली आहे.
डोंगरगाव येथील शेतजमीन निसर्गाच्या पावसावर अवलंबून असल्यामुळे यावर्षी अल्प पर्जन्यवृष्टी झाल्याने पिकावर विपरित परिणाम झाला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या शेतावर शासकीय योजनेमार्फत शेततळे तयार करण्यात आले आहेत. ज्या श्ोतकऱ्यांनी शेतावर स्वखर्चातून बोअरवेलची व्यवस्था केली त्या शेतकऱ्यांना विजभार नियमनामुळे पुरेशा प्रमाणात सिंचन करता आले नाही तसेच निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतातील उभ्या पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव झाल्याने शेतातील उभी पिके कोमजली असल्यामुळे पीक उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेतीची मशागत व पिकांची लागवड केली मात्र सिंचनाच्या अपुऱ्या सोयी, भारनियमनाचा बडगा व कीड व रोगराईचा प्रादुर्भाव यामुळे शेतातील पिके जमीन दोस्त झाले असल्याची डोंगरगाव येथील धान उत्पादक शेतकऱ्यांची ओरड असताना याकडे महसुल व कृषी विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांचे मोका पंचनामे होणार किंवा नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा ठाकला आहे. (नगर प्रतिनिधी)