सात महिन्यांत ९.७२ रुपयांनी वाढले पेट्रोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 10:15 PM2018-05-27T22:15:49+5:302018-05-27T22:16:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पेट्रोल व डिझेलच्या सतत होणाऱ्या दरवाढीमुळे भंडारेकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. गत सात महिन्यात जिल्ह्यात ९.७२ रुपयांनी पेट्रोल तर, १२.९९ रुपयांनी डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. या दरवाढीचा आॅटोचालकांसह जड वाहनचालक व दुचाकी चालकांना चांगलाच आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत बऱ्यापैकी घसरण झाली असली तरी केंद्र व राज्य सरकारकडून या दोन्ही अतिज्वलनशील पदार्थांवर विविध कर लादून त्याची वसूली वाहनचालकांसह सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे. सध्या टर्बो व इथेलॉन मिश्रित अशा दोन प्रकारच्या पेट्रोलची विक्री होत आहे. परंतु, पेट्रोल मध्ये १० टक्के मिळविण्यात येणाऱ्या इथेलॉनचा खरा फायदा सरकारलाच व तेल कंपन्यांनाच होत असल्याचे दिसून येते. १ नोव्हेंबर २०१७ रोजी पेट्रोल प्रती लिटर ७६.५७ रुपये तर डिझेल ५९.८० रुपये होते. तर, रविवार २७ मे रोजी पेट्रोल ८६.२९ रुपये आणि डिझेल ७२.७९ रुपये प्रती लिटर होते. अवघ्या सात महिन्यात जिल्ह्यात ९.७२ रुपयांनी पेट्रोल तर १२.९९ रुपयांनी डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल व डिझेलच्या दिवसेंदिवस वाढत्या दरांमुळे इतर जिवनावश्यक वस्तूंवरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या दिवसेंदिवस वाढत्या दरांवर अंकुश लावण्यासाठी सरकारने तात्काळ योग्य पाऊल उचलावे अशी मागणी आहे.
जिल्ह्यातील ५० टक्के पेट्रोलपंपावरील दर बदलतात आॅनलाईन पद्धतीने
सरकारने पेट्रोल व डिझेलचे दर निश्चित करण्याचा विषय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडला आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी पेट्रोल व डिझेलचे दर बदलतात. सदर बदलनारे दर जिल्ह्यातील ५० टक्के पेट्रोलपंपावर आॅनलाईन पद्धतीने बदलत असून उर्वरित ५० टक्के पेट्रोल पंपावरील दर मॅन्युअली पद्धतीने प्रत्येक दिवशी सकाळी ६ वाजता बदलविले जात असल्याचे शहरातील एका पेट्रोलपंप मालकाने सांगितले.
दरवाढीचा लाभ सरकारलाच
सध्या ८६.२९ रुपये प्रती लिटरने पेट्रोलची विक्री होत असून प्रती लिटर पेट्रोल विक्रीवर २.७६ पैसे विक्रेत्यांना मिळतात. या विक्री होणाºया पेट्रोलवर केंद्र सरकार २१.७५ रुपये आणि राज्य सरकारच्या २३.६२ रुपयांच्या कराचा समावेश आहे. राज्य सरकार फिक्स सेस म्हणून ९ रुपये व २५ टक्के इतर कर पेट्रोलच्या डिलर किंमतीवर आणि डिझेलच्या डिलर किंमतीवर फिक्स सेस १ रुपया तसेच २१ टक्के इतर कर लावत असल्याने याचा सर्वाधिक फायदा सरकारलाच होत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.
ऊस उत्पादकांना फायदाच नाही
ऊसाच्या मळीपासून इथेलॉन हे इंधन सर्वाधिक केले जाते. सध्या पेट्रोलमध्ये १० टक्के इथेलॉनचा वापर होत आहे. इथेलॉनला पेट्रोलचा दर मिळत असला तरी त्याचा खरा फायदा ऊस उत्पादकांना होत नसल्याचे शेतकरी व शेतकºयांचे प्रश्न रेटणारे सांगतात. सरकारकडूनही शेतकºयांच्या ऊसाला योग्य भाव दिल्या जात नाही, अशी ओरडही जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
निवडणूक काळात १९ दिवस रोखली दरवाढ
कर्नाटक निवडणुकीच्या कालावधीत तब्बल १९ दिवस पेट्रोल व डिझेलची दरवाढ रोखण्यात आली होती. सध्या महाराष्ट्राच्या तुलनेत कर्नाटकात ६ रुपयांनी पेट्रोल तर २ रुपयांनी डिझेल स्वस्त असल्याचे जाणाकारांकडून सांगण्यात आले.
इथेनॉलनयुक्त पेट्रोलचा त्रास पंप मालकांना
सध्या पेट्रोलमध्ये १० टक्के इथेलॉन मिक्स केल्या जाते. त्याचा संपर्क पाण्याशी आल्यास पेट्रोल व इथेलॉन वेगवेगळे होत ते तळाशी जाते. इथेलॉन चेक करण्यासाठी पेट्रोलपंप मालकांना तेल कंपन्या कुठल्याही सोयी-सूविधा पुरवित नाहीत. अनावधानाने पेट्रोल व इथेलॉन वेगवेगळे झाल्यास ते ग्राहकांच्या वाहनाच्या इंधन टँक मध्ये जावून नागरिकांची वाहन अचानक बंद पडल्यावरच पंप मालकांच्या लक्षात ते येते. इथेलॉन व पेट्रोल वेगवेगळे झाल्यावर पंप मालकांना नागरिकांच्या रोषाला पुढे जावे लागत असल्याने इथेलॉनयुक्त पेट्रोलचा सर्वाधिक त्रास पंप मालकांनाच सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.
ब्राझीलमध्ये ३५ टक्केपर्यंत इथेलॉनचा वापर
स्वदेशी इंधन म्हणून इथेलॉनची ओळख. देशातील पैसा देशातच रहावा, या हेतूने पेट्रोलमध्ये इथेलॉन मिस्क केल्या जाते. वास्तविक पाहता देशात कुठेही इथेलॉन ब्लेंडिंग होत नाही. ते केवळ मिक्स केल्या जाते. ब्राझीलमध्ये योग्य पद्धतीने इथेलॉनचा सुमारे ३५ टक्केच्यावर वापर होत असल्याचे एका अभ्यासू पेट्रोलपंप मालकाने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर सांगितले.
पेट्रोल-डिझेलवर महाराष्ट्रात सर्वाधिक कर
देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेलवर सर्वाधिक कर लावण्यात आले आहेत. त्यामुळे येथील वाहनचालकांना इतर राज्यापेक्षा जादाच पैसे पेट्रोल व डिझेलसाठी मोजावे लागत आहेत.
ग्राहक सुविधा क्रमांकाद्वारे कळतो झटपट खरा दर
जिल्ह्यातील प्रत्येक पेट्रोलपंपावर ग्राहकांना आजच्या दराबाबत सूविधा व्हावी या हेतूने एक विशिष्ट फलक लावण्यात आले आहेत. या फलकावर एक ग्राहक सुविधा क्रमांक देण्यात आला आहे. त्या क्रमांकावर एसएमएस केल्यास तात्काळ ग्राहकाला त्या दिवशीचा पेट्रोल व डिझेलचा खरा दर सहज माहिती होत असल्याचे पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
तेल कंपन्या होत आहेत गब्बर
केंद्र व राज्य सरकारच्या जनसामान्य विरोधी धोरणांमुळे दिवसेंदिवस होत असलेल्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीचा लाभ सरकारसह खºया अर्थाने तेल कंपन्यांना होत असल्याचा आरोप जनसामान्यांकडून केला जात आहे. गत काही वर्षांपासून तोट्यात असल्याचे सांगणाºया तेल कंपन्या सध्या फायद्यात आल्याचे बोलले जात आहे. तेल कंपन्या सध्या गब्बर होत असून सर्वसामान्यांना होणारा त्रास लक्षात घेता सरकारने त्वरित योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.