पेट्रोलपंपांची तपासणी ‘शुन्य’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:27 AM2017-07-19T00:27:50+5:302017-07-19T00:27:50+5:30
राज्यात ई-पेट्रोल चोरीचा मुद्दा चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. भंडारा जिल्ह्यात ५२ पेट्रोलपंप असतानाही एकाही पंपांची साधी तपासणी झालेली नाही.
जिल्ह्यात ५२ पंप : अधिकारांबाबत नागरिक अनभिज्ञ
इंद्रपाल कटकवार । लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्यात ई-पेट्रोल चोरीचा मुद्दा चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. भंडारा जिल्ह्यात ५२ पेट्रोलपंप असतानाही एकाही पंपांची साधी तपासणी झालेली नाही. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तपासणी चमुने कारवाई केली; मात्र भंडारा जिल्हा याला अपवाद ठरल्याने सर्व कारभार ‘आलबेल’ असल्याचे दिसून येत आहे. पेट्रोल चोरीच्या प्रकारासह आवश्यक सुविधांकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केले की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.
भंडारा जिल्ह्यात सात तालुके असून एकूण ५२ पेट्रोलपंप आहेत. या पंपावरून पेट्रेल आणि डिझेलची विक्री होते. या विक्री दरम्यान पेट्रोल आणि डिझेल कमी देण्याची किंवा चोरीची प्रकरणे घडत असतात, परंतू कुणीही तक्रार करीत नसल्याने कारवाई शुन्य आहे. काही जागरूक नागरिकांकडून विरोध होत असला तरी समान्यजण साथ देत नसल्याची बाबही समोर आली आहे.
दुसरीकडे नागरिकांमध्ये जनजागृतीचा अभाव, हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे समोर आले आहे. भंडारा नागरिकांना पंपावर आवश्यक सुविधांबाबत विचारणा केली असता, त्यांना मोजक्याच बाबी माहीत असल्याचे दिसून आले.
शासनाच्या निर्णयानुसार पेट्रोल पंपावर एकूण ११ प्रकारच्या सुविधा असणे आवश्यक आहे. या सुविधा कोणत्या या संदर्भात मात्र एकाही नागरिकाला परीपुर्ण माहिती नसल्याचे दिसून आले. पंपावर असलेल्या सुविधा म्हणजे नागरिकांचे अधिकार असतानाही या अधिकारांबाबत नागरिक अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.
भंडारा तालुक्यात १४ पेट्रोल पंप
भंडारा तालुक्यात एकूण १४ पेट्रोलपंप आहे. यातील काही पंपांवर आवश्यक सुविधा आहे तर काही पंपांवर त्या नसल्याचे दिसून आले आहे. काही पेट्रोलपंपावर सुविधा देण्यासंदर्भात बांधकाम सुरू आहे. पिण्याचे शुद्ध पाणी, वाहनात नि:शुल्क हवा, लॅव्हेटरीची सुविधा, पार्किंगची व्यवस्था आदी सुविधा असल्या तरी मिळणारे पेट्रोल शंभर टक्के शुद्ध व मोजमापानुसार आहे की नाही याची हमी नागरिकांमध्ये दिसून आली नाही. बहुतांश पंपांमध्ये सीसीटीव्हीची व्यवस्था आहे. जिल्ह्यात आयओसीएलचे १७, बीपीसीएलचे १४, एमपीसीएलचे १८, रिलायंस कंपनीचे दोन व इस्सार कंपनीचा एक असे एकूण ५२ पेट्रोलपंप आहेत.
पेट्रोल पंपांच्या तपासणीबाबत राज्य शासनाकडून कुठलाही आदेश प्राप्त झालेला नाही. अन्य जिल्ह्यात तपासणी झाली असेल तर ती पोलिस प्रशासनाने केली आहे.
- रमेश भेंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी भंडारा.
शासनाने दिलेल्या सुचनेनुसार सुविधा पेट्रोल पंपावर देण्यात येतात. शासनाकडून किंवा सबंधित विभागाकडून पंपांच्या तपासणी संदर्भात कुठलेही लिखित पत्र मिळालेले नाही.
- सुभाष गुर्जर, अध्यक्ष, पेट्रोल-डिझेल असोसिएशन भंडारा.