पेट्रोलपंपांवरील मनमानी ठरणार जीवघेणी!
By admin | Published: January 3, 2015 12:36 AM2015-01-03T00:36:31+5:302015-01-03T00:36:31+5:30
अतिज्वलनशील पदार्थांचा साठा ज्याठिकाणी असतो, त्या पेट्रोल पंपावर मात्र सुरक्षेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टींग आॅपरेशन’ मध्ये उघडकीस आला आहे.
भंडारा : पेट्रोल, डिझेल हे ज्वलनशील पदार्थ हाताळताना अतिशय काळजी घ्यावी लागते. परंतु, या अतिज्वलनशील पदार्थांचा साठा ज्याठिकाणी असतो, त्या पेट्रोल पंपावर मात्र सुरक्षेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टींग आॅपरेशन’ मध्ये उघडकीस आला आहे.
भंडारा जिल्ह्यात एकाही पेट्रोलपंपावर पेट्रोलियम कंपन्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालनही केले जात नाही. याला वेळीच आळा घातला नाही तर भविष्यात एखाद्या मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दिवसागणिक दुचाकी-चारचाकी वाहनांची संख्या सर्वत्र वाढत आहे. त्यासोबतच पेट्रोल-डिझेलची मागणीही सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पेट्रोल पंपांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. परंतु, पेट्रोलपंपसाठी असलेल्या नियमावलीचे पालन मात्र कुठेही होताना दिसत नाही. त्यामुळे पेट्रोल पंपावर एखादा अपघात घडल्यास किंवा नियमबाह्यरित्या विकल्या जाणाऱ्या खुल्या पेट्रोलचा दुरूपयोग झाल्यास त्यासाठी जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
इंडियन आॅईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन मुख्य कंपन्यांचे पेट्रोल आणि डिझेल पंप जिल्ह्यात आहेत. या तिन्ही कंपन्या सरकारच्या नियंत्रणाखाली चालतात. त्यासाठी त्या-त्या कंपन्यांचे पेट्रोल पंपांसाठी काही मार्गदर्शक सूचना आहेत. त्याचे पालन होते किंवा नाही हे तपासण्याची जबाबदारी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांवर असते. मात्र, ज्या पद्धतीने नियमांची पायमल्ली होत आहे, त्यावरून पेट्रोल पंपांची तपासणी होत नसल्याचे दिसून आले आहे.
जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात सात पेट्रोलपंप आहेत. यापैकी सहा पेट्रोलपंप सुरू आहे.
त्यापैकी राष्ट्रीय महामार्गावर पाच पेट्रोलपंप आहेत. शहराच्या मध्यभागी एक तर भंडारा-तुमसर राज्य मार्गावर एक पेट्रोलपंप आहे. शहरातील या पेट्रोलपंपावरील सुविधा नाममात्र असून प्रत्येक पेट्रोलपंपावर कुठल्या ना कुठल्या सुविधांचा अभाव आहे.
‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टींग आॅपरेशन’ मध्ये शहरातील काही पेट्रोलपंपवर शिशीमध्ये पेट्रोल मागितले असता पेट्रोल देण्यात आले. यावर कुणीही आक्षेप घेतला नाही. या पंपावर पेट्रोल भरुन देणारा कर्मचारीही पेट्रोल देण्यासाठी नकार दिला नाही. यावरून तेथील कर्मचाऱ्यांना वाहनाशिवाय डबकी व शिशीत पेट्रोल देता येत नाही, या नियमाची जाणीव नसावी, असे यावेळी दिसून आले. (लोकमत चमू)
पेट्रोल-डिझेल पंपावर सुरक्षेच्या दृष्टीने मोबाईलचा वापर कुणीही करू नये. एखाद्या ग्राहकाने मोबाईल वापरण्याचा प्रयत्न केला तर त्याला रोखण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. खुल्या पद्धतीने पेट्रोल देणेही नियमबाह्य आहे. नागरिकांनीही गाईडलाईन्स पाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आमचे म्हणने आहे. पट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट झाल्यास त्याची अंमलबजावणी त्वरीत करण्यात येते. पयार्याने आधीच्या किंमतीत व आताच्या किंमतीत फरक असल्याने त्याचा आर्थिक भार सहन करावा लागत आहे.
- सुभाष गुर्जर,
संचालक, गुर्जर पेट्रोल पंप भंडारा.