भंडाऱ्याचे छायाचित्र राज्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 11:51 PM2017-12-15T23:51:49+5:302017-12-15T23:52:10+5:30
राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय 'महाराष्ट्र माझा' छायाचित्र स्पर्धेतील निवडक सर्वोत्कृष्ट छायाचित्रांचे प्रदर्शन नागपूर येथे भरविण्यात आले आहे.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय 'महाराष्ट्र माझा' छायाचित्र स्पर्धेतील निवडक सर्वोत्कृष्ट छायाचित्रांचे प्रदर्शन नागपूर येथे भरविण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. या प्रदर्शनीत भंडारा येथील वरिष्ठ छायाचित्रकार सुरेश फुलसुंगे व तुमसर येथील युवा छायाचित्रकार मृगांक वर्मा या दोन छायाचित्रकारांच्या छायाचित्रांना स्थान मिळाले आहे.
मध्यवर्ती संग्रहालयाच्या कलादालनात माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने महाराष्ट्र माझा हे राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शन आयोजित केले. यात राज्यातील छायाचित्रकारांनी काढलेली उत्कृष्ट व निवडक छायाचित्रे या प्रदर्शनात लावण्यात आली आहेत.
स्पर्धेत ‘सोलर पैनल ने केली किमया’ या मथळ्यांतर्गत शेतातील विहिरीवर बसविलेल्या सोलर पॅनलचे आकर्षक छायाचित्र प्रदर्शित करण्यात आले आहे. हे छायाचित्र जिल्ह्यातील तुमसर येथील छायाचित्रकार मृगांक वर्मा यांनी काढले आहे. तुमसर तालुक्यातील सात हजार लोकसंख्येच्या येरली या गावातील हे छायाचित्र आहे. येरली येथे चार शेतकºयांनी शासनाच्या जवाहर विहीर योजनेचा लाभ घेत अवर्षणातही सिंचन साध्य करून शेतात हिरवळ आणली. वर्मा यांच्या छायाचित्राला प्रदर्शनात आलेल्या दर्शकांनी दाद दिली.
आयुष्याचे ओझे सहजतेने पेलणाऱ्या इसमाचे छायाचित्र भंडारा येथील सुरेश फुलसुंगे यांनी काढले आहे. डोक्यावर टोपल्या घेऊन लाखनी येथे विकायला जाणाऱ्या बुरड कामगाराचे छायाचित्र सुरेश फुलसुंगे यांनी टिपले आहे. फुलसुंगे यांचे छायाचित्र गेल्या वर्षीच्या प्रदर्शनीत सुद्धा सामाविष्ट करण्यात आले होते. फुलसुंगे यांचे छायाचित्र लक्ष वेधून घेणारे असून या छायाचित्राचे अनेकांनी कौतूक केले आहे.
महाराष्ट्र माझा राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा जुलै महिन्यात आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत राज्यातून ३ हजार २०० छायाचित्र आले होते. निकालानंतर २०० निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.