काेरोना संकटकाळात फोटोग्राफर संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:32 AM2021-05-22T04:32:50+5:302021-05-22T04:32:50+5:30
लग्नसराईचा हंगाम असूनही महाराष्ट्रमध्ये सुरू असलेला कोरोनाचा कहर यामुळे फोटोग्राफी व्यवसाय करणारे छोटे-मोठे छायाचित्रकार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. सुखाचे, ...
लग्नसराईचा हंगाम असूनही महाराष्ट्रमध्ये सुरू असलेला कोरोनाचा कहर यामुळे फोटोग्राफी व्यवसाय करणारे छोटे-मोठे छायाचित्रकार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. सुखाचे, आनंदाचे क्षण टिपणारे दु:खाच्या खाईत सापडले असून, त्यांच्या उदरनिवार्हाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हातावर पोट असणारे बरेचशे छायाचित्रकार ज्यांनी बँक, फायनान्सकडून कर्ज काढून कॅमेरे तथा अत्याधुनिक साहित्य खरेदी केले. ही कर्जफेड करताना टाळेबंदीमुळे त्यांचे एकूणच वर्षाचे बजेट बिघडले असून, बऱ्याचशा छायाचित्रकारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. छायाचित्रकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून दोन पैसे आपल्याला मिळतील व फायनान्स, बँकद्वारे घेतलेल्या कर्जाची रक्कम भरू, अशा आशेत असताना यावर्षीदेखील फोटोग्राफी करणाऱ्यांना कोरोनामुळे मोठ्या संकटाचा सामना करावा लागत असल्याने कर्जाची फेड करावी तरी कशी, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
लग्नसराईचा हंगाम सुरू होताच महाराष्ट्रात कोरोनाने वेगाने डोके वर काढले. शासनाने दिलेल्या नियमावलीमध्ये शुभ विवाहासाठी मोजक्याच लोकांची परवानगी दिली. यामध्ये वधू व वर या दोन्ही परिवारांना अशा अडचणीत फोटोग्राफर कसा लावावा व आपल्या आनंदाच्या आठवणी कशा ठेवाव्यात, याची चिंता वाटू लागली आहे, तर अशा छोट्या विवाह सोहळ्यात फोटोग्राफरची आवश्यकता नसल्यामुळेही बरेच विवाह छोटेखानी पार पडत आहेत. त्यामुळे फोटोग्राफर हा सध्या पूर्णत: खचलेला दिसत आहे. फोटोग्राफी या व्यवसायावर एडिटर, ग्राफिक, डिझायनर, फोटो एडिटर, व्हिडिओ एक्सपोजिंग ऑपरेटर, लाइव्ह प्रक्षेपण करणारी एलइडी वॉल, ड्रोन वायफाय कॅमेरा, प्री-वेडिंग अशा बऱ्याच लोकांना रोजगार मिळणे थांबला आहे. यावर्षी बऱ्याच विवाह सोहळ्यांच्या फोटो व व्हिडिओ शूटिंगच्या ऑर्डर रद्द झाल्यामुळे सर्व फोटोग्राफी व्यवसाय करणारे छायाचित्रकार यांच्यावर आनंदाचे क्षण टिपताना स्वत: मात्र दु:खात असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.