जिल्हा परिषद शाळेत फुलविली परसबाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:24 AM2021-07-01T04:24:16+5:302021-07-01T04:24:16+5:30
भंडारा : कोरोना संक्रमण काळात अनेक उपक्रम राबविण्यात अनेकांची पीछेहाट झाली. मात्र, उमेदीचा मार्ग न सोडता लाखनी तालुक्यातील सोनमाळा ...
भंडारा : कोरोना संक्रमण काळात अनेक उपक्रम राबविण्यात अनेकांची पीछेहाट झाली. मात्र, उमेदीचा मार्ग न सोडता लाखनी तालुक्यातील सोनमाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी शाळेत परसबाग फुलवून इतरांसमोर नवनिर्मितीचा संकल्प सोडला.
नवसत्राचा प्रारंभ दोन दिवसांपूर्वी झाला. शाळेत विद्यार्थी येत नसले तरी शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली. या काळात शालेय परिसर गजबजून दिसावा, सुंदर आणि आकर्षक वातावरणाने विद्यार्थ्यांची मने प्रफुल्लित व्हावीत, या उदात्त दृष्टिकोनातून मुख्याध्यापक बी. एम. रामटेके यांनी परसबाग फुलविण्यासाठी सरपंच नूतन देशपांडे यांच्यासह सहाय्यक शिक्षक व अन्य ग्रामस्थांच्या मदतीने ही बाग फुलविली आहे. थोड्याच कालावधीत शाळा परिसर हिरव्या वनराईसह फुलांनी बहरेल.
केलेले परिश्रम वाया जात नाहीत, असे नेहमी बोलले जाते. तेच प्रत्यक्ष कृतीतून मुख्याध्यापक व शिक्षकांनी करून दाखविले. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. अर्थातच. यासाठी शाळेच्या सर्व सदस्यांसह सरपंच, सहाय्यक शिक्षक, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, मदतनीस यांचीही मोलाची साथ लाभली. याप्रसंगी मिरेगाव शाळेचे मुख्याध्यापक डमदेव कहालकर, सरपंच नूतन विजयकुमार देशपांडे, मुख्याध्यापक बी. एम. रामटेके, सहाय्यक शिक्षक एल. टी. बावनकुळे, सहाय्यक शिक्षिका डी. वाय. वनवे, वनिता गायधने, उर्मिला वालकर, कविता उत्तम रामटेके, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष लोकेश देशपांडे, मदतनीस सुरेखा इटवले, विश्वनंदा मेश्राम, प्रशांत बडोले, एस. आर. चिमणकर व राजेश कान्हेकर यांसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
कोट बॉक्स
शाळा परिसर स्वच्छ, सुंदर व आकर्षक दिसावा, अशी संकल्पना मनात होती. परसबागेच्या रूपातून ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली आहे. याचा आम्हाला आनंद आहे. यासाठी शाळेच्या शिक्षकांसह, सरपंच व गाव पदाधिकाऱ्यांनी मोलाची साथ दिली आहे.
- डी. एम. रामटेके, मुख्याध्यापक, जि. प. शाळा, सोनमाळा.