तातडीने बोनस देऊन रब्बी धानाची उचल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:23 AM2021-06-23T04:23:23+5:302021-06-23T04:23:23+5:30
भंडारा : महाविकास आघाडी सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या बोनसची रक्कम अद्याप प्रदान केलेली नाही. भंडारा, गोंदिया ...
भंडारा : महाविकास आघाडी सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या बोनसची रक्कम अद्याप प्रदान केलेली नाही. भंडारा, गोंदिया जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होतो आहे. सध्या शेतीची कामे सुरु झाली असून बी-बियाणे, खते व इतर शेतीविषयक साधने खरेदी करावयास व शेती कामास शेतकऱ्यांना पैशांची गरज असताना त्यांच्या हक्काचे बोनस शासनाद्वारे देण्यात येत नाही. धान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. येत्या दहा दिवसाच्या आत धान उत्पादकांना बोनस न मिळाल्यास भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांसह आंदोलन छेडणार असल्याचा इशारा माजी पालकमंत्री तथा आ. डॉ. परिणय फुके यांनी दिला. याबाबतचे पत्र त्यांनी आ. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना दिले.
डॉ. फुके यांनी पत्रात म्हटले आहे की , महाराष्ट्र शासनाद्वारे धान उत्पादक शेतकऱ्यांना एप्रिल महिन्यामध्ये त्यांच्या हक्काचे बोनस मिळणे अपेक्षित होते. पण जून महिन्याचा मध्य उलटून गेला असताना अद्याप बोनस मिळालेले नाही. त्याचप्रमाणे शासनाद्वारे खरेदी करण्यात आलेल्या धानाचे पैसे सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेले नाही. शासनाद्वारे बिजाई पुरवठा करण्यात येतो. तो देखील अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांना खासगी दुकानातून महागात बिजाई खरेदी करावी लागत आहे. यामुळे त्यांचे आर्थिक शोषण होत आहे. या बोनस पोटी शेतकऱ्यांचे ८०० कोटी रुपये शासनाकडे थकीत आहे. एकीकडे वीजबिल थकीत आहे, म्हणून सरकार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन खंडित करत आहे तर दुसरीकडे त्यांच्या हक्काचे बोनसचे पैसे थकीत ठेवते हा सापत्नभावाची वागणूक का ? असा सवाल आ. फुके यांनी केला आहे .
सध्या शेतीची कामे सुरु झाले असताना गोरगरीब शेतकऱ्यांना शेतीविषयक साहित्य खरेदीसाठी व शेतीकामासाठी पैशांची गरज असते. मात्र ऐन हंगामात शासनाकडून बोनस देण्यात आले नसल्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. तसेच खरीप हंगाम सुरू झाला असताना सुद्धा अजून पर्यंत उन्हाळी धानाची उचल शासनाने केली नसल्यामुळे शासन ऐन हंगामामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करुन त्यांच्यावरती अन्याय करीत आहे. शासनाच्या या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे . त्यामुळे हा अन्याय आपण कदापिही सहन करणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे हक्काचे बोनस तत्काळ न दिल्यास नाईलाजास्तव भंडारा व गोंदिया येथील पणन कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकून अधिकाऱ्याच्या खुर्चीचा लिलाव करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात येईल असा इशारा आ. परिणय फुके यांनी दिला आहे.