पाकीटमार झाले गायब; वाढल्या चोऱ्या, घरफोड्या
By युवराज गोमास | Published: August 21, 2023 05:54 PM2023-08-21T17:54:50+5:302023-08-21T17:55:48+5:30
जिल्ह्यात सात महिन्यांत ४९६ चोऱ्या व घरफोड्या
भंडारा : डिजिटल व्यवहार वाढल्यापासून पाकीट चोरीच्या घटना जिल्ह्यातून नामशेष झाल्या आहेत. जिल्ह्यात जानेवारी ते जुलैपर्यंत एकही पाकीटमारीची घटना नाही. चोऱ्या, घरफोड्या वाढल्या आहेत. भुरट्या चोरांनी तर हौदोस घातल्यागत स्थिती आहे. मात्र, पोलिस विभागाला गुन्हे उकलण्यात फारसे यश आलेले दिसत नाही. पोलिस विभागावर कार्यप्रणालीवर यामुळे प्रश्नचिन्ह लागले आहे.
आर्थिक व्यवहार करण्यासाठी आता विविध ॲप उपलब्ध आहेत. यामुळे डिजिटल आर्थिक व्यवहाराचे प्रमाण वाढले आहे. खिशात पैसे ठेवण्याची भानगड आता फारसी राहिलेली नाही. तसेच, गर्दीच्या ठिकाणी व बँकेतून पैसे काढताना जबरी चोरी होण्याचे प्रमाणही आटोक्यात आले आहेत. पूर्वी बाहेर जाताना पैसे चोरीला जाण्याची भीती सतावत असायची. व्यापारी व अन्य व्यावसायिकांना आर्थिक व्यवहारासाठी बऱ्याचदा लाखो रुपये सोबत न्यावे लागत होते. सोबत बॅग असल्यास ती केव्हा पळविली जाईल, याचा नेम नसायचा. मात्र, आता अधिकचे पैसे पाकिटात ठेवण्याची गरज उरली नसल्यामुळे पाकीटमार जिल्ह्यातून गायब झाले आहेत.
सात महिन्यांतील चोऱ्यांच्या घटना
पाकीटमारांचे प्रमाण जिल्ह्यातून संपले असले तरी घरफोडी व भुरट्या चोरांनी हौदोस घातल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. जबरी चोऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. जिल्ह्यात जानेवारी ते जुलै २०२३ या सात महिन्यांच्या कालावधीत जबरी चोरीच्या ३ घटना घडल्या. घरफोडी ६७ तर भुरट्या चोरीच्या घटना ४२६ घटना घडल्या. याप्रकरणी पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.
गुन्हांच्या उकलीचे प्रमाण कमी
जिल्ह्यात जानेवारी ते जुलै २०२३ या कालावधीत जबरी चोरीच्या ३ घटनांपैकी सर्व घटनांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी बजावलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. परंतु, घरफोडीच्या ६७ घटनांपैकी केवळ २५ गुन्हे उघड झाले आहेत. भुरट्या चोऱ्यांच्या ४२६ घटनांपैकी २५९ घटनांची उकल झाली आहे. एकूण ४९६ घटनांपैकी २८६ गुन्ह्यांची उकल झाली असून २१० गुन्ह्यांची अद्यापही उकल झालेली नाही.
नागरिकांनाे, अशी घ्या काळजी
आठवडी बाजार अथवा गर्दीच्या ठिकाणी जातांना नागरिकांनी अंगावर फारसे दागिने घालू नये. सुनसान रस्त्याने महिलांनी एकट्याने जाऊ नये. बाहेरगावी जाताना विशेष काळजी घ्यावी. रोकड व दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावे. घरांचे गेट व दरवाजे, खिडक्या व्यवस्थित बंद कराव्या. रात्रीच्या वेळी अनोळखी संशयित इसम दिसून येताच तातडीने पोलिसांना माहिती द्यावी. वाहन बाहेर ठेवताना लॉक करून ठेवावे.
नागरिकांनी सतर्कता बाळगावी. मालमत्तेची काळजी घ्यावी. वाहने बाहेर ठेवताना लॉक करून ठेवावे. बाहेरगावी जाताना पोलिसांना अथवा शेजाऱ्यांना माहिती द्यावी. घरात किमती वस्तू न ठेवता बँकेतील लॉकरमध्ये ठेवावे. चोरी, घरफोडीच्या घटना घडताच तातडीने पोलिसांना माहिती देत तक्रार नोंदवावी.
- नितीन चिंचोळकर, पोलिस निरीक्षक, स्थागुशा भंडारा.