पिक विमा योजना ठरली फसवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 12:56 AM2018-04-06T00:56:37+5:302018-04-06T00:56:37+5:30
प्रधानमंत्री पिक विमा योजना सक्तीची केल्याने शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड बसत आहे. भंडारा जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आणि दुष्काळाचा ज्या शेतकऱ्यांना फटका बसला, अशा शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्रधानमंत्री पिक विमा योजना सक्तीची केल्याने शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड बसत आहे. भंडारा जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आणि दुष्काळाचा ज्या शेतकऱ्यांना फटका बसला, अशा शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे काढून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि शेतकऱ्यांनी लुट होऊ देणार नाही, असा ईशारा माजी खासदार तथा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिला.
यावेळी ते म्हणाले, भंडारा जिल्ह्यात ५६,०६२ शेतकऱ्यांनी ५४,९५३ हेक्टर क्षेत्रातला पिक विमा काढला होता. त्यापोटी चार कोटी २८ लाख ४३ हजार रूपयांची रक्कम पिक विमा कंपनीकडे भरली. यावर्षी दुष्काळ जाहिर होऊनही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ मिळाला नाही. एकीकडे सक्तीने पैसे वसुल करायचे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना लाभ द्यायचा नाही, असे शासनाचे फसवे धोरण असल्याचा आरोपही पटोले यांनी केला.
यावर्षी राज्य शासनाने तुर डाळीला ५,६०० रूपये समर्थन मुल्य जाहिर केले आहे. परंतु आधारभुत केंद्र सुरू न केल्यामुळे या शेतकऱ्यांना २८०० ते ३००० रूपये इतक्या कमी भावाने डाळ विकावी लागत आहे. तत्कालीन युपीए सरकारने सरसकट कर्जमाफी केल्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले होते. पंरतु भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातही राज्य शासन अधिभार आकारुन जनतेची पिळवणूक करीत आहेत. राष्ट्रीय व राज्य मार्गावरील दारुची दुकाने बंद झाल्याचे कारण सांगुन महसुलात येणारी तुट भरुन काढण्यासाठी पेट्रोलवर अधिभार तर दुष्काळ जाहिर केल्याचे कारण सांगुन अधिभार आकारला होता.
आता दारूची दुकाने सुरू होऊनही पेट्रोलवरील अधिभार कमी करण्यात आला नसल्याचा आरोप पटोले यांनी केला. एकीकडे शासन आरक्षणाला हात लावणार नाही असे सांगते आणि दुसरीकडे नोकरी भरती करत नाही. त्यामुळे आरक्षणच राहिले कुठे? असा सवाल करून बेरोजगारांना काम मिळू न देणारे हे सरकार असल्याचा आरोपीही नाना पटोले यांनी केला.