भर पावसाळ्यात पाण्यासाठी पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 05:00 AM2020-08-12T05:00:00+5:302020-08-12T05:01:11+5:30
लाखांदूर तालुक्यातील भागडी हे चार हजार लोकसंख्येचे गाव. चुलबंद नदीच्या तिरावर नळयोजनेची विहिर आहे. येथूनच पाईपलाईनद्वारे पाणी आणून नळाद्वारे नागरिकांना पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीपासून नळातून येणारे पाणी गढूळ आणि दूषित असल्याच्या गावकऱ्यांनी तक्रारी केल्या. पिण्यासह इतर कामासाठी पाण्याचा वापर केल्यानंतर काही गावकऱ्यांच्या अंगाला खाज सुटली.
दयाल भोवते।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : भर पावसाळ्यात चिखल तुडवत पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ लाखांदूर तालुक्यातील भागडी येथील महिलांसह वृद्ध आणि चिमुकल्यांवर आली आहे. नळ योजनेचे पाणी गढूळ येत असून गावकऱ्यांच्या अंगाला खाज सुटत असल्याने आता एक किलोमीटर अंतरावरील एका शेतातून पाणी आणून गावकरी आपली तहान भागवित आहेत.
लाखांदूर तालुक्यातील भागडी हे चार हजार लोकसंख्येचे गाव. चुलबंद नदीच्या तिरावर नळयोजनेची विहिर आहे. येथूनच पाईपलाईनद्वारे पाणी आणून नळाद्वारे नागरिकांना पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीपासून नळातून येणारे पाणी गढूळ आणि दूषित असल्याच्या गावकऱ्यांनी तक्रारी केल्या. पिण्यासह इतर कामासाठी पाण्याचा वापर केल्यानंतर काही गावकऱ्यांच्या अंगाला खाज सुटली. त्यामुळे गावकऱ्यांनी नळयोजनेचे पाणी पिणे आणि वापरणे बंद केले. आता पाण्यासाठी एक किलोमीटर अंतरावरील एका शेतातील कृषीपंपाचा आधार घेतला जात आहे. महिलांसोबतच वृद्ध, चिमुकलेही पाणी आणण्यासाठी धडपडत आहेत. सध्या लाखांदूर तालुक्यात जोरदार पाऊस बरसत असून यामुळे शेतापर्यंतचा रस्ता पूर्ण चिखलाने माखलेला आहे. या चिखलमय रस्त्यावरून पाणी आणताना वयोवृद्धांना मोठी कसरत करावी लागते.
गत पाच वर्षापासून पावसाळा आला की, भागडीवासीयांना या समस्येला तोंड द्यावे लागते. शुद्धीकरण यंत्रणा नसल्याने चुलबंद नदीचे पाणी थेट नळाद्वारे नागरिकांच्या घरापर्यंत पोहचते. गावात एक खासगी आरो प्लांट आहे. काही जण पाणी विकतही घेतात. परंतु गोरगरीबांना पाणी विकत घेणे शक्य नसल्याने त्यांना पाण्यासाठी पायपीट करण्याशिवाय पर्याय नसतो.
या प्रकाराबाबत गावकऱ्यांनी वारंवार प्रशासनाला माहिती दिली. परंतु अद्यापही यावर कोणत्याच उपाययोजना झाल्या नाहीत. यंदा तर या दूषित पाण्यामुळे नागरिकांना आजाराची लागण होण्याची भीती आहे. आधीच कोरोनाचे संकट आणि त्यात दूषित पाण्यामुळे गावकरी धास्तावले आहेत.
आजाराची लागण
नळयोजनेचे पाणी वापरल्याने अनेकांच्या अंगाला खाज सुटली तर काहींना इतर आजारही झाल्याची माहिती आहे. नळयोजनेच्या विहिरीचे जलस्त्रोत बंद पडल्याने या विहिरीत पावसाळ्यात साठलेल्या पुराचे पाणी थेट गावकºयांना पुरविले जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे दूषित व गढूळ पाणी आंघोळ व कपडे धुण्यासाठी वापरले जाते. परंतु या पाण्याने काही नागरिकांच्या अंगाला खाज सुटल्याचे सांगण्यात आले. या पाण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता गावकरी आता एक किलोमीटर अंतरावरून पाणी आणत आहेत. परंतु प्रशासनाने सध्या तरी कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने गावकºयांची पायपीट सुरु आहे.