कमी पाण्यामध्ये पिकाचे नियोजन करा
By admin | Published: March 29, 2016 12:30 AM2016-03-29T00:30:44+5:302016-03-29T00:30:44+5:30
शेतीसाठी व पिण्यासाठी उपलब्ध असलेल्या जलस्त्रोताचा योग्य नियोजन करुन जास्तीत जास्त लाभ कसा घेता येईल.
प्रज्ञा गोळघाटे यांचे प्रतिपादन : पवनी येथे कार्यक्रम
पवनी : शेतीसाठी व पिण्यासाठी उपलब्ध असलेल्या जलस्त्रोताचा योग्य नियोजन करुन जास्तीत जास्त लाभ कसा घेता येईल. याबाबत काटकसरीचा वापर करुन कमीतकमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त पिकांचे नियोजन शेतकरी बांधवांनी करावे व उत्पादन वाढवावे असे प्रतिपादन प्रकल्प संचालक (आत्मा) प्रज्ञा गोळघाटे यांनी केले.
कृषि व्यवस्थापन संस्था (आत्मा) व तालुका कृषी अधिकारी पवनी यांचे संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृहात आयोजित केलेल्या जलजागृती अभियान अंतर्गत सुक्ष्म सिंचन पध्दतीने फायदे व ठिंबक तुषार संचाचे व्यवस्थापन शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीकडून सेंद्रीय शेतीकडे वळावे व नफा मिळवावा असे सांगुन परंपरागत कृषी विकास, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी आदेशकुमार गजभिये, गोसेखुर्दचे सहायक अभियंता अहिरराव, वनपरिक्षेत्र अधिकारी डी. एन. बारई, लागवड अधिकारी घरडे, पं.स.चे कृषी अधिकारी वानखेडे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पी. पी. पर्वते, नेटाकिमचे कृषी विद्यावेतन धनंजय मेहत्रे, कृषी अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षणार्थी शेतकरी उपस्थित होते. जलसंधारण, मृदसंधारण, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, याविषयीची माहिती तालुका कृषी अधिकारी ए. डी. गजभिये यांनी दिली व पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे मार्गदर्शन केले. धनंजय मेहत्रे यांनी पिकांना मोकाट पाणी देण्यापेक्षा ठिंबक व तुषार सिंचन पध्दतीचा वापर करावा असे सांगुन ठिंबक व तुषार सिंचन वापरण्याची पध्दत समजावून दिली. यावेळी सहायक अभियंता अहिरवार, वनपरिक्षेत्र अधिकारी बारई, कृषी पर्यवेक्षक मेश्राम व हुमणे यांनीही मार्गदर्शन केले. संचालन पी. पी. पर्वते यांनी तर आभार कृषी अधिकारी वाघमारे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)